शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
3
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
4
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
5
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
6
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
7
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
8
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
9
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
10
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
11
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
12
इथिओपियातून दिल्लीत आली ज्वालामुखीची राख; तब्बल १२ वर्षांनंतर हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक 
13
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
14
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
15
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
16
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
17
IND vs SA : टीम इंडियानं घरच्या मैदानात गुडघे टेकल्यावर नेटकऱ्यांना आठवला विराट; गंभीर होतोय ट्रोल
18
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
19
तुमचा मेंदू बनतोय रीलचा ‘गुलाम’! स्मृती अन् मानसिक आरोग्यासाठी ठरतोय हानिकारक
20
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीपाद नाईकांच्या सन्मानाला ठेच का पोहोचवता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 13:02 IST

धडाकेबाज कार्यपद्धती वा क्षमता श्रीपाद नाईक यांच्याकडे नसेलही; पण त्यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी स्वतःच्या क्षमतेने न्याय देत पार पाडली.

वामन प्रभू, ज्येष्ठ पत्रकार

लोकसभेसाठी पुढील चार महिन्यांत होणाऱ्या निवडणुकांचे वेध देशाला लागले आहेत. पाच राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यापासून लोकसभा निवडणुकांच्या चर्चेला अधिकच गती मिळाली आहे. आपला चिमुकला गोवाही त्यास अपवाद नाही. लोकसभेत आपले दोनच खासदार निवडून जाणार असले, तरी उमेदवारीसाठी आतापासूनच इच्छुकांची सुरू झालेली चाचपणी आणि स्पर्धा पाहता हसावे का रडावे, हेच कळेनास झाले आहे. काँग्रेस पक्षासाठी या गोष्टी नवीन नाहीत. त्यामुळे काँग्रेसमधील अशा प्रकारांचे कोणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही; पण भारतीय जनता पक्षातही मागील काही दिवसांपासून उत्तर गोव्यातील उमेदवारीसाठी काही जण खडा टाकून अंदाज घेण्यासाठी जो आकांडतांडव सुरू आहे, ते पाहता सर्वसामान्य जनतेचे बरेच मनोरंजन होत आहे. 

कोण कुठले दिलीप परूळेकर अकस्मात प्रकट होऊन आपणच उत्तर गोवा मतदारसंघातून उमेदवारीसाठी कसे पात्र आहोत, हे सांगू लागले. ते कमी म्हणून की काय दयानंद सोपटे यांनी आपलीही हॅट या रिंगणात टाकून यदाकदाचित नवा उमेदवार शोधण्याचे पक्षाने ठरवलेच तर आपले नावही चर्चेत असावे, यासाठी आवश्यक खबरदारी घेतली. उमेदवारीची इच्छा बाळगणे वा त्यासाठी प्रयत्न करणे चुकीचे नाही; पण आपण नेमके काय करतो, कोणाविरुद्ध करतो, याचे भान ठेवून थोडासा विवेक दाखवणे, ज्येष्ठ नेत्याच्या सन्मानाला ठेच पोचणार नाही, याची खबरदारी घेणे अपेक्षित असते; पण तसे झाले नाही. उलट या नेत्यांचे हसेच झाले.

दिलीप परूळेकर, दयानंद सोपटे आदींनी श्रीपाद नाईक यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या सन्मानाला ठेच पोहोचविण्याचे काम निश्चितच केले. शिवोलीचे माजी आमदार, माजी मंत्री दयानंद मांद्रेकरही त्याच पंक्तीत दाखल झाले होते; पण त्यांनी वेळीच आपल्या जिभेला आवर घातला. ज्यांच्याबाबतीत आपण बोलत आहोत वा आरोप करीत आहोत त्यांचा सन्मान वा आदर राखता येणार नसेल तर निदान अवास्तव बोलून त्यांचा अनादर करू नये, याचे साधे भानही लोकसभेसारख्या लोकशाहीच्या पवित्र मंदिरात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांनी ठेवू नये, हे दुर्दैवी आहे. गोव्याच्या राजकारणातील सर्वांत मृदू व्यक्तिमत्त्व अशी सार्थ ओळख असलेल्या श्रीपाद भाऊंची लोकसभेतील जागा घेण्यासाठी उतावीळ झालेल्या या दोघांनी त्यांना निवृत्त होण्याचा सल्ला देताना ज्येष्ठतेनुसार त्यांचा मान ठेवून थोडी सभ्य भाषा वापरली असती तर तो त्यांचा स्वतःचाच गौरव ठरला असता; पण दुर्दैवाने त्यांना जिभेवर नियंत्रण ठेवता आले नाही. श्रीपाद नाईक यांना मानणाऱ्या अनेकांना ते रुचेल याची अपेक्षा नव्हतीच आणि नेमके तेच झाले. आता वरिष्ठ नेत्यांनी कान पिळल्यानंतर सारवासारव झाली असली तरी भाजपच्या गोव्यातील वृद्धीसाठी श्रीपाद नाईक यांनी केलेल्या कार्याचा, त्यागाचा या मंडळींना पूर्ण विसर पडावा याचे मात्र आश्चर्य वाटते.

स्व. मनोहर पर्रीकर यांच्या खांद्याला खांदा लावून गोव्यात भारतीय जनता पक्ष रुजविण्यासाठी कार्य करीत आलेल्या श्रीपाद नाईक यांच्याशी माझा परिचय तब्बल तीन दशकांचा. गोवा भाजपातील शिस्तबद्ध कार्यकर्त्यांच्या यादीत श्रीपाद नाईक यांचे स्थान बरेच वर असून पक्षाने दिलेले कोणतेही कार्य हू की चू न करता निमूटपणे करीत आलेल्या श्रीपाद भाऊंना माझ्यासारख्या अनेकांनी पाहिले असेल. मनोहर पर्रीकर यांच्याकडे असलेली धडाकेबाज कार्यपद्धती वा क्षमता श्रीपाद नाईक यांच्याकडे नसेलही आणि तशी कार्यक्षमता प्रत्येक नेत्याकडे असायलाच हवी असेही नाही; पण श्रीपाद नाईक यांनी आपल्यावर टाकलेली प्रत्येक जबाबदारी स्वतःच्या क्षमतेने न्याय देत पार पाडली. याबाबत कोणाचेही दुमत नसावे. अशावेळी त्यांच्या ज्येष्ठतेचा, त्यांनी केलेल्या कार्याचा, त्यागाचा मान ठेवून त्यांचा सन्मान करायची गरज असताना त्यांना दूषणे देत निवृत्ती घेण्यास भाग पाडू पाहणाऱ्यांनी त्यांच्या चाहत्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला असता तर ही आगळीक घडली नसती. आमदारपदापासून अटलबिहारी वाजपेयी ते नरेंद्र मोदींपर्यंतच्या केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक खात्यांची जबाबदारी आपल्या क्षमतेने पार पाडणाऱ्या श्रीपाद नाईक यांच्या कार्याची दखल प्रत्येकास घ्यावीच लागेल, खासदार निधीतून उत्तर गोवा मतदारसंघात त्यांनी ज्या अनेक योजना राबविल्या, त्याबद्दल तर स्वतंत्र लेख लिहावा लागेल. धारगळचे आयुष इस्पितळ, तर श्रीपाद नाईक यांच्याच कार्याची पावती आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात आज श्रीपाद नाईक यांचे जे स्थान आहे, ते त्यांच्या आजवरच्या कार्यामुळेच. श्रीपाद नाईक भंडारी समाजाचे एक शक्तिशाली नेते असल्याने त्यांचा हवा तसा वापर पक्ष संघटनेने करून घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत; पण स्वतः श्रीपाद नाईक यांनी त्याबद्दल कधी कुरबुर केली नाही. पर्वरी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याची पूर्ण तयारी केली असतानाही पक्षादेश मानून माघार घेणारे श्रीपाद नाईक आम्ही पाहिले आहेत. फोंडा मतदारसंघात पराभव निश्चित असतानाही पक्षादेश शिरसावंद्य मानून केंद्रीय मंत्रिपद सोडून थेट निवडणूक रिंगणात उतरताना आम्ही पाहिले आहे. नशीब बलवत्तर असते वा थोडासा लढाऊ बाणा दाखवला असता तर मुख्यमंत्रिपदही कदाचित त्यांच्याकडे आले असते; पण तो त्यांचा स्वभाव नाही; हे वेळोवेळी गोवेकरांनी अनुभवले अजूनही काही उदाहरणे देता येतील. दिलीप परूळेकर, दयानंद सोपटे यांना कदाचित श्रीपाद नाईक आता थकलेले वाटत असतील. ते थकलेही असतील, पण अखेर पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने त्यावर निर्णय घेण्याची गरज आहे. श्रीपाद नाईक यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीत असा आगाऊपणा करून त्यांना निवृत्त होण्याचा सल्ला देणे निश्चितच चूक आहे. श्रीपाद नाईक यांच्या सन्मानाला ठेच पोहोचविण्याचे हे उद्योग यापुढे बंद होतील अशी अपेक्षा आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण