पणजी : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सर्व मंत्र्यांना शनिवारी सायंकाळी खात्यांचे वाटप केले. भाजपच्या मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली आहेत, तर सरकारमध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मात्र पंख छाटले गेले आहेत. मगोचे अध्यक्ष असलेले मंत्री दीपक ढवळीकर यांना सहकार खाते न देता प्रिंटिंग अॅण्ड स्टेशनरी हे खाते दिले गेले आहे. सहकार खाते महादेव नाईक यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. शनिवारीच मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मिकी पाशेको यांनाही महत्त्वाचे खाते दिले गेलेले नाही. ग्रामीण विकास आणि पुरातत्व व पुराभिलेख ही खाती पाशेको यांना मिळाली आहेत. मुख्यमंत्रिपद नाकारले गेल्याने उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे नाराज होते. त्यांची नाराजी घालविण्यासाठी त्यांच्याकडे आरोग्य व नगरनियोजन ही अतिरिक्त खाती सोपविण्यात आली आहेत. मगोचे ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर यांची पूर्वीचीच खाती कायम ठेवण्यात आली आहेत. दीपक ढवळीकर यांच्याकडील सहकार खाते महादेव नाईक यांना दिल्यानंतर ढवळीकर यांना एखादे महत्त्वाचे खाते दिले जाईल, असे अपेक्षित होते. तथापि, मुख्यमंत्र्यांनी सर्व वजनदार खाती भाजपच्याच मंत्र्यांना दिली आहेत. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी स्वत:कडे गृह, अर्थ, खाण, पर्सनल, शिक्षण आणि दक्षता ही खाती ठेवली आहेत. पार्सेकर हे मंत्री होते, तेव्हा त्यांच्याकडे आरोग्य व पंचायत ही खाती होती. आरोग्य खाते आता उपमुख्यमंत्री डिसोझा यांना, तर पंचायत खाते दयानंद मांद्रेकर यांना देण्यात आले आहे. कायदा हे अतिरिक्त खातेही डिसोझा यांना दिले गेले आहे. रमेश तवडकर यांना कृषी व पशुसंवर्धन ही अतिरिक्त खाती दिली गेली आहेत. दिलीप परुळेकर यांना पोर्ट्स हे अतिरिक्त खाते दिले गेले आहे. मिलिंद नाईक, एलिना साल्ढाणा, आवेर्तान फुर्तादो यांची पूर्वीचीच खाती कायम ठेवण्यात आली आहेत. पाशेको हे त्यांना दिल्या गेलेल्या खात्यांवर समाधानी राहतात का, हे पाहावे लागेल. यापूर्वी त्यांनी पर्यटन, पशुसंवर्धन, कृषी, बंदर कप्तान अशी अनेक खाती हाताळली होती. त्यापैकी एकही खाते आता त्यांना मिळालेले नाही. मगो पक्षावर नियंत्रण ठेवावे व त्या पक्षाची आणखी वाढ होऊ देऊ नये, या हेतूने पाशेको यांना मंत्रिमंडळात घेतले गेले, हे आता अधिक स्पष्ट झाले आहे. (खास प्रतिनिधी)
वजनदार खाती भाजपकडे
By admin | Updated: November 16, 2014 01:30 IST