लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मगोपच्या तिकिटावर प्रथम आमदार झालो तेव्हा मी किंवा दीपक आम्ही कोणीही मंत्रिपद घेतले नव्हते. मी मंत्रिपद न घेता त्यावेळी पांडुरंग राऊत यांना मंत्री केले, असे मगोपचे नेते, वीज मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले.
ढवळीकर म्हणाले की, 'पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा प्रवेश द्यावा किवा उमेदवारी द्यावी याबाबत आमसभेचा निर्णय अंतिम असतो. मी साधा आमदार. मगोपच्या कार्यकारिणीलाही हा अधिकार नाही. पक्ष सुधारण्यासाठी प्रत्येक पक्षाने असाच निर्णय घ्यायला हवा.' ते पुढे म्हणाले की, '२००० च्या दशकात मगोच्या आमसभेने पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा प्रवेश द्यायचा नाही व तिकीटही द्यायची नाही असा निर्णय घेतला व तो अजून कायम आहे. मगोप खूप जुना पक्ष आहे. आज असे दिसते की, पाच राजकीय पक्षांची नोंदणी केद्रीय निवडूक आयोगाला रद्द करावी लागली. कारण या पक्षांना कोणी वाली नाही. चांगले कार्यकर्ते द्या, आमदार म्हणून निवडून या.'
'मगोपला' सहा ते सात जागा मिळतातच
सर्वच राजकीय पक्षांकडून सध्या जिल्हा पंचायत निवडणुकांची तयारी सुरू आहे. या निवडणुकीसाठी मगोपच्या तयारीसंबंधी विचारले असता ढवळीकर म्हणाले की, 'आमचे सहा ते सात जागांवर उमेदवार निवडून येतात. भाजपकडे आमची युती असल्याने दोन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून या विषयावर चर्चा करतील. उभय पक्षांच्या कार्यकारिणीचा तसेच मुख्यमंत्र्यांचाही विचार घेतला जाईल.