लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतरही नोकरीशिवाय राहतात, कारण त्यांच्याकडे कौशल्ये नसतात. शिक्षकांनी शिक्षण आणि कौशल्य विकासाची सांगड घालण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आजकाल मुलांना फक्त कागदावर पदव्या हव्या असतात. मात्र, नुसत्या पदव्या देणारे महाविद्यालयीन शिक्षण आता पुरे असे वाटू लागले आहे. कौशल्यास अधिक महत्त्व आहे. त्यामुळे शंभर टक्के निकालासह १०० टक्के रोजगारक्षम व्यवस्थेसाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, सरकार सर्वोतोपरी मदतीस तयार आहे' असे प्रतिपादन मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
गोवा विद्या प्रसारक मंडळाच्या दोन शैक्षणिक इमारतींचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर वीजमंत्री सुदिन ढवळीकर, माजी सरपंच रामचंद्र नाईक, जीव्हीएम आमसभेचे अध्यक्ष भास्कर खांडेपारकर, कार्यकारी समितीचे अध्यक्ष कृष्णा शेट्ये, सचिव दीपक गावकर, जीव्हीएम वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या स्मिता हेदे, जीव्हीएम शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जोजन मॅथ्यू आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक पदवीधर कौशल्य, कठोर परिश्रमामुळे कोट्यवधी रुपये कमावताना दिसतात. मात्र, हे प्रमाण वाढले पाहिजे. सर्वांगिण शिक्षणासाठी आम्ही काहीच कमी पडू देणार नाही. सुविधांसाठी निधी दिला जात आहे. शैक्षणिक क्षेत्रात आम्हाला आणखी एक क्रांती करायची आहे. शंभर टक्के निकालापुढे एक पाऊल टाकत शैक्षणिक संस्थेतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या हाती चांगला रोजगार असेल, अशी व्यवस्था निर्माण करूया.
जीव्हीएम आमसभेचे अध्यक्ष भास्कर खांडेपारकर म्हणाले की, 'अनुदानित शिक्षण संस्थांना सरकारकडून वेळोवेळी सहकार्य मिळत असल्याने शिक्षणासाठी पूरक असे वातावरण तयार होत आहे. सरकार निधी कमी पडू देत नाही. साथन सुविधा निर्माण करण्यासाठीसुद्धा सरकार चालढकल करत नाही ही चांगली बाब आहे. कार्यकारी समितीचे अध्यक्ष कृष्णा शेट्ये यांनी स्वागत केले. सचिव दीपक गावकर यांनी आभार मानले.
उद्योगांशी सांगड घाला, त्यांची गरज ओळखा
मुख्यमंत्री म्हणाले की, 'कौशल्यपूर्ण शिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षणमहर्षी दादा वैद्य यांनी दीडशे वर्षापूर्वी कौशल्यपूर्ण शिक्षणाचे स्वप्न पाहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी आग्रही भूमिका घेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातसुद्धा आम्ही कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी पायाभूत साधन-सुविधा निर्माण करत आहोत. त्यासाठी कौशल्य पूरक मनुष्यबळ तयार करत आहोत. शिक्षकांनीसुद्धा चौकटीबाहेर जाऊन विचार करावा. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कोणीही बेरोजगार राहता कामा नये हे माझे स्वप्न आहे. आजच्या युवकांनी पारंपरिक उद्योगांची कास धरायला हवी. गोव्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक जग विस्तारत आहे. औद्योगिक कंपन्यांना शिक्षित, प्रशिक्षित व कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची गरज आहे. औद्योगिक विश्वाकडे हातमिळवणी करा. त्यांना नेमके काय हवे आहे याचा पाठपुरावा करा व त्या अनुषंगाने तुमचे विद्यार्थी घडवा.
कोमुनिदादींचे सहकार्य
वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले, 'फोंडा परिसरात केजी ते पीजी व त्यापुढे उच्च शिक्षण देणारी अनेक महाविद्यालये आहेत. आता आम्हाला नसिंग महाविद्यालयाची नितांत गरज आहे. फोंड्यात जी शैक्षणिक क्रांती झाली, त्यामागे कोमुनिदादचे सहकार्य तेवढेच मोलाचे आहे. त्यांनी शैक्षणिक संस्थांना गरजेनुसार जागा उपलब्ध करून दिल्यानेच आज येथे शिक्षणाची मंदिरे उभी राहिली आहेत.
Web Summary : Chief Minister Pramod Sawant emphasized skill development alongside education for better employability. He urged educators to bridge the gap between academia and industry needs, advocating for practical training. He wants a system where every graduate is job-ready, with the government's full support. Industries need skilled people.
Web Summary : मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने बेहतर रोजगार क्षमता के लिए शिक्षा के साथ कौशल विकास पर जोर दिया। उन्होंने शिक्षकों से शिक्षा और उद्योग की जरूरतों के बीच अंतर को पाटने का आग्रह किया, और व्यावहारिक प्रशिक्षण की वकालत की। वह एक ऐसी प्रणाली चाहते हैं जहां हर स्नातक नौकरी के लिए तैयार हो, जिसमें सरकार का पूरा समर्थन हो। उद्योगों को कुशल लोगों की जरूरत है।