पणजी : ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत अरुण साधू, अभिनेता शशी कपूर, लेखक ह. मो. मराठे, पं. नारायण बोडस, प्रियरंजनदास मुन्शी यांच्यासह 20 मान्यवरांच्या निधनावर गोवा विधानसभेत शोकप्रस्ताव संमत करण्यात आला. माजी खासदार दिवंगत अमृत कांसार, माजी आमदार दुलो कुट्टीकर, राज्याचे माजी मुख्य सचिव जे. सी. आल्मेदा,उद्योजक जयसिंह मगनलाल, स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ पेडणेकर, साहित्यिक र. वी. जोगळेकर, नाट्य दिग्दर्शक महाबळेश्वर रेडकर, शिक्षणतज्ञ श्रीधर फडके, शास्रीय गायिका सुहासिनी कारबोटकर, कोकणी कवी युसूफ शेख, शास्रीय गायिका गिरिजा देवी, स्वा. सैतिक बळवंतराव देसाई, हवाई दलाचे माजी मार्शल अर्जान सिंग, स्वा. सैनिक गणपत पुनाळकर फोंड्याचे लोकमतचे प्रतिनिधी पत्रकार वासू नाईक यांनाही आदरांजली वाहण्यात आली.मंत्री रोहन खंवटे यांनी अॅड. अमृत कांसार यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना मयें स्थलांतरितांच्या मालमत्तेच्या प्रश्नावर त्यांनी भरपूर काम केल्याचे स्पष्ट केले. घटनात्मक बाबींवर त्यांचा अभ्यास दांडगा होता, असे ते म्हणाले. उद्योजक जयसिंग मगनलाल यांच्या निधनावरही त्यांनी शोक व्यक्त केला.चर्चिल आलेमांव यांनी प्रियरंजनदास मुन्शी यांना आदरांजली वाहताना ते फुटबॉलचे शिल्पकार होते, असे नमूद केले. चर्चिल म्हणाले की, ह्यत्यांच्याशी नेहमीच माझा संबंध आला. फुटबॉलपटूना त्यांनी प्रोत्साहन दिले. तसेच माझ्या संघालाही नेहमीच साहाय्य केले. कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी लोकमतचे फोंडा प्रतिनिधी दिवंगत वासू नाईक यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना ते अन्यायाविरुद्ध नेहमीच आवाज उठवायचे,असे नमूद केले. नाईक यांचे सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य आहे. तसेच ते उत्कृष्ट क्रिकेटपटू होते, असे मंत्री गावडे म्हणाले.नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई म्हणाले की, र. वी. जोगळेकर यांनी आणीबाणीच्या काळात दिलेला लढा कोणीच विसरू शकणार नाही. अमृत कांसार, माजी मुख्य सचिव दिवंगत जे. सी. आल्मेदा, प्रियरंजनदास मुन्शी यांचे कार्यही उल्लेखनीय आहे. पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी प्रियरंजनदास मुन्शी यांचे फुटबॉलसाठी योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे स्पष्ट केले. वीजमंत्री पांडुरंग मडकईकर म्हणाले की, कांसार यांचा कोमुनिदाद, देवस्थान कायदे या विषयात दांडगा अभ्यास होता. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, आमदार प्रतापसिंह राणे, आमदार प्रसाद गांवकर, प्रवीण झांट्ये, मायकल लोबो यांनीही शोकप्रस्तावावर भाषणे केली.
ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत अरुण साधू, अभिनेता शशी कपूर, लेखक ह. मो. मराठे यांना गोवा विधानसभेत आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 19:56 IST