साकवाळ महामार्गावरील अपघातात दोन अल्पवयीन बालकांचा दुर्देवी अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 10:44 PM2020-03-16T22:44:41+5:302020-03-16T22:45:59+5:30

जॉगिंगसाठी गेले असता भरधाव वेगाने आलेल्या चारचाकीने या दोन्ही बालकांना मागून दिली जबर धडक

two minor children died in an accident on the Sakwal highway goa | साकवाळ महामार्गावरील अपघातात दोन अल्पवयीन बालकांचा दुर्देवी अंत

साकवाळ महामार्गावरील अपघातात दोन अल्पवयीन बालकांचा दुर्देवी अंत

Next

वास्को: सोमवारी (दि.१६) पहाटे दक्षिण गोव्यातील साकवाळ भागात जॉगिंगसाठी गेलेल्या दर्शन लमाणी (वय १४) व अनिल राठोड (वय १६) या दोन अल्पवयीन मुलांना मागून भरधाव वेगाने येऊन चारचाकी वाहनाने जबर धडक दिल्याने दोघांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडलेल्या या अपघातात मरण पावलेले हे दोन्ही बालक एकाच वसाहतीतील राहणारे असून त्यांच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियाबरोबरच परिसरातही दु:खाचे वातावरण आहे.

वेर्णा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक श्रीधर कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास सदर अपघात घडला. जुआरीनगर येथील ‘लमाणी कॉलनी’ मध्ये राहणारे दर्शन लमाणी व अनिल राठोड हे बालक मित्र असून ते सकाळी ६.३० च्या सुमारास जॉगिंगसाठी घरातून बाहेर निघाले होते. दोघेही बालक जॉगिंग करत साकवाळ येथील बिट्सपिलानी कॉलेज च्या बाहेरील रस्त्यावर पोहोचले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या (चारचाकी मडगावहून दाबोळी विमानतळाच्या दिशेने येताना) ‘हुंडाई आय २०’ या चारचाकीने (क्र: केए ५१ एमएम १५०१) त्या दोन्ही बालकांना जबर धडक दिली. सदर अपघातात दोन्ही बालक फेकले जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

भरधाव वेगाने चारचाकी हाकून दोन अल्पवयीन बालकांना धडक देऊन त्यांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या चारचाकी चालक गुरू गुगन (वय ३६, रा: वेळ्ळूर - तमिळनाडू) यास वेर्णा पोलिसांनी त्वरित ताब्यात घेऊन कारवाई करून त्याला अटक केली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक श्रीधर कामत यांनी दिली. सोमवारी अपघातात मरण पोचलेल्या दर्शन व अनिल यांचा मृतदेह नंतर चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आला असून येथे त्यांच्या मृतदेहावर पंचनामा करण्यात आला. नंतर दोघांचाही मृतदेह मडगावच्या हॉस्पिसीयो इस्पितळाच्या शवगृहात पाठवून त्यांच्यावर शवचिकित्सा करून त्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती वेर्णा पोलीसांनी दिली.

सोमवारी सकाळी अपघातात मरण पोचलेला दर्शन लमाणी हा काणकोण येथील श्री कटयानी भानेश्वर विद्यालयात शिक्षण घेत होता अशी माहिती मिळालेली असून अनिल राठोड साकवाळ येथील सेंट जोझेफ विद्यालयातील विद्यार्थी असल्याचे सूत्रांनी माहितीत कळविले. एकाच वसाहतीत राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांसोबतच शेजाऱ्यांवरही दु:खाचा डोंगर कोसळला. वेर्णा पोलिसांनी सदर अपघाताचा पंचनामा केला असून पोलीस निरीक्षक हरीष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीधर कामत अधिक तपास करीत आहेत.
 

Web Title: two minor children died in an accident on the Sakwal highway goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात