मडगाव: मडगावपासून 17 कि.मी.अंतरावर असलेल्या मोबोरनजीक साळ नदीत केवळ दहा तासाच्या अवधीत दोन मच्छीमारी ट्रॉलर्स बुडण्याची घटना घडल्या असून एका ट्रॉलरातील तीन खलाशांना दृष्टीच्या जीवरक्षकांनी जेटस्कीच्या सहाय्याने तडीवर आणले. यापैकी एक घटना रविवारी रात्री तर दुसरी घटना सोमवारी दुपारी घडली.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीप्रमाणो, मोबोर समुद्रातून या होडय़ा साळ नदीत आत शिरताना मध्ये वाटेत असलेल्या रेतीच्या टेकडय़ांना त्या आपटल्याने त्यांचे इंजीन बंद होऊन त्या पाण्यात कलल्या. या दोन्ही बोटी बाहेर काढण्यासाठी तटरक्षक दलाकडून मदत घेतली गेली. मात्र सायंकाळर्पयत या बोटी नदीतून बाहेर काढता आल्या नव्हत्या.
कुटबण बोटमालक संघटनेचे अध्यक्ष रॉय बर्ाेटो यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मोबोर समुद्रातून या बोटी साळ नदीतील जेटीवर आणताना या दोन्ही दुर्घटना घडल्या. पाण्याच्या प्रवाहाने या नदीच्या मुखावर रेतीच्या टेकडय़ा निर्माण होतात. त्यामुळे बोटी नदीत आणण्यात अडथळे निर्माण होतात. सुकतीच्यावेळी ही अडचण जास्त सतावते. या दोन्ही दुर्घटना होण्यामागे या रेतीच्याच टेकडय़ा कारणीभूत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, बोटमालक संघटनेने सोमवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मच्छीमारी होडय़ा सुखरुप नदीत आणण्यासाठी यापूर्वी सरकारने जो ब्रेक वॉटर्स प्रकल्प हाती घेतला होता तो त्वरित पूर्ण करावा अशी मागणी केली. या प्रकल्पामुळे पाण्याचा प्रवाह वाढून टेकडय़ा वाहून जातात आणि त्यामुळे होडय़ांना विनाव्यत्यय नदीत येणो शक्य होणार आहे. काही एनजीओंनी याला आक्षेप घेतल्यामुळे सध्या हे काम बंद पडले आहे. सरकारने आवश्यकता भासल्यास वाटाघाटी कराव्यात पण हा प्रकल्प मार्गी लावावा अशी मागणी या संघटनेने केली. यावेळी रॉय बर्ाेटो यांच्यासह पेट्रीक डिसिल्वा व अँथनी रोड्रीगीस हे पदाधिकारी उपस्थित होते.