पणजी : तिळारी धरणातून गोव्याला केला जाणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. यामुळे गोव्याला फटका बसला असून विशेषत: बार्देस व डिचोली तालुक्यातील शेतीसाठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तिळारीचे कालवे स्वच्छ करणे आणि दुरुस्ती काम करण्यासाठी तिळारीचा पाणीपुरवठा महिनाभर गोव्यासाठी बंद राहील, अशी माहिती मिळाली आहे. सध्या तिळारीचा पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे डिचोली आणि बार्देस तालुक्यातील काही दुर्गम भागांतील नागरिक चिंताग्रस्त बनले आहेत. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पर्वरी विभागाने शनिवारी सायंकाळी जाहीर नोटीस जारी केली आहे. तिळारीहून पूर्ववत पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत बार्देस व डिचोली तालुक्यातील काही भागांना मर्यादित पाणीपुरवठा असेल, असे बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी म्हटले आहे. अंजुणे धरणात पाण्याची पातळी कमी झाल्याने अगोदरच सत्तरी तालुक्यातील पाणीपुरवठ्यावर मर्यादा आली आहे. दरम्यान, डिचोलीचे आमदार नरेश सावळ म्हणाले की, तिळारीहून पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे आपण डिचोलीतील सावरधाट, वडावल, खरपाल व साळ अशा पाच-सहा गावांमध्ये पंप बसवून पाण्याचा पुरवठा टाक्यांद्वारे करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी आपण मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याशी चर्चा केली. ढवळीकर यांनी अभियंत्यांना सूचना केल्यानंतर त्यांनी पंप व टाक्या बसविण्यासाठीच्या जागांचे सर्वेक्षणही केले आहे. (खास प्रतिनिधी)
तिळारीचेही पाणी बंद
By admin | Updated: November 22, 2015 01:38 IST