लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: माझे गुरु पं. जितेंद्र अभिषेकी बुवांने मला दिलेले ज्ञान हे सर्वोपरी आहे. एखाद्याला दिलेला 'शब्द' पाळावा हा कानमंत्र त्यांनी मला दिले होते. आजही मी माझ्या गुरुंनी दिलेला 'शब्द' पाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे सुप्रसिद्ध गायक पं. अजित कडकडे यांनी सांगितले. गायन सादर केल्यानंतर प्रेक्षक श्रोत्यांकडून मिळणारा टाळ्यांचा आवाज माझ्यासाठी खूप मोठा सन्मान असल्याचे ते म्हणाले.
आषाढी एकादशीनिमित्त आपले गायन सादर करण्यासाठी बायणा रवींद्र भवन येथे आले होते. कार्यक्रमानंतर पं. अजित कडकडे यांनी वास्कोचे ग्रामदैवत दामोदराचे दर्शन घेतले. यावेळी ते बोलत होते. त्याच्याबरोबर बायणा रवींद्र भवन अध्यक्ष जयंत जाधव, उपाध्यक्ष डॉ. धर्मेंद्र प्रभूदेसाय, श्री दामोदर भजनी सप्ताह बाजारकर समितीचे अध्यक्ष नरेंद्र गुरव, खजिनदार दिलीप काजळे, माजी अध्यक्ष दामू कोचरेकर, प्रदीप मांद्रेकर उपस्थित होते. वास्कोतील श्री दामोदर भजनी सप्ताहात मला गायन सादर करण्याची बऱ्याचवेळा संधी मिळाली आहे. देव दामोदर व भजन यांचे नाते अतूट असल्याचे पं. कडकडे यांनी सांगून, ३० जुलैला साजरा होणाऱ्या १२६ व्या वास्कोतील श्री दामोदर भजनी सप्ताहाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या.