- सूरज नाईकपवार मडगाव - गोव्यातील दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी पोलिस ठाण्यातून बेपत्ता झालेली ती तीन सख्खी भावंडे शुक्रवारी रात्री उत्तर गोव्यातील कळंगुट येथे सापडली. मोबाईल लोकेशनवरुन पोलिसांनी या भावंडाचा शोध घेत अखेर त्यांना गाठले. त्यांना नंतर साखळी येथे राहणाऱ्या त्यांच्या एका मामाकडे सुपर्द करण्यात आले.
या भावडांमध्ये मोठी बहिणी १६ वर्षाची तर एक भाउ तेरा व लहान बहिण ११ वर्षाची आहे. हे कुटुंबिय मूळ पश्चिम बंगाल राज्यातील असून, त्यांची आई हयात नाही. वडिलाने नंतर दुसरा विवाह केला होता. ते कामगार असून, पांझरकणी येथे हे कुटुंबिय रहात होते. या मुलांचा सुरुवातीपासून मामाकडे ओढा होता. त्यामुळे त्यांनी तेथे जाण्याचा निणर्य घेउन घर सोडले होते असे पोलिस तपासात आढळून आले आहे.
लहान बहिणीला शाळेत सोडण्यासाठी मोठी बहिण व भाउ तिला घेउन घरातून बाहेर पडले. बसधरुन ते साखळी येथे मामाच्या घरी जाणार होते. मात्र त्यांंना ते ठिकाण कुठे आहे हे माहित नव्हते. चुकून ते कंंळगुट येथे पोहचले होते. त्या मोठया मुलीकडे मोबाईल होता. मात्र ती वांरवार तो बंद करीत होती. त्यामुळे पोलिसांना लोकेशन शोधताना अडथळा येत होता. शेवटी कळंगुट येथे एका देवालयाजवळ त्यांचे लोकशन आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्वरीत तेथे धाव घेउन त्या सर्वाना शोधून काढले.ही मुले बेपत्ता झाल्याची तक्रार कुंकळ्ळी पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी भादंसंच्या ३६३ व गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गंत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला होता. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासकाम सुरु करुन त्या मुलांचा शोध लावला.