लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पक्षशिस्तीकडे कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे ठणकावताना भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, 'जे कोणी नवीन आमदार असतील त्यांनी पक्षाच्या नियमित वर्गामध्ये व सत्रांमध्ये सहभागी व्हायला हवे तसेच पक्षाची विचारधारा समजून घ्यायला हवी.
दामू म्हणाले की, '२०२७ च्या निवडणुकीपर्यंत अनेक गोष्टी होतील. पक्षात 'साफसफाई' होईल. निवडणूक लढवण्याची इच्छा सर्वांनाच असते. त्यामुळे काहीजण विधाने करतात; परंतु त्याचा पक्षाला फटका बसता कामा नये. भाजपा शिस्तीचा पक्ष आहे. उमेदवार म्हणून कोणी जर आपण कसा चांगला हे सांगत असेल तर त्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही; परंतु पक्षाला बाधक होईल असे काही बोलू नये. २०१७ नंतर भाजपात आलेल्या काही आमदारांनी पक्षाची विचारधारा स्वीकारलेली आहे. प्रत्येकाने पक्षाची ध्येयधोरणे पाळायला हवीत. राजकीय विधाने करून सनसनाटी निर्माण करू नये,' असेही दामू म्हणाले.
'बाबूंविषयी कोणताही ठराव नाही'
पेडणे मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर तसेच माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यात नियमित शाब्दिक चिखलफेक होत असते. पेडणे भाजप मंडळाने बाबू आजगावकर यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा ठराव घेतला असल्याचे वृत्त पसरलेले आहे. यासंबंधी दामू यांना विचारले असता ते म्हणाले की, पेडणे भाजप मंडळाने असा कोणताही ठराव घेतलेला नाही.