लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : एकमेकांबद्दल मनात हेवेदावे असतील तर ते बाजूला ठेवून पक्षासाठी काम करा. 'हे जुने व ते नवे' असा वाद निर्माण करू नका. मतभेदांमुळे पक्षाचे नुकसान करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कार्यकर्त्यांना केले.
उत्तर गोव्यातून पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. पुन्हा पक्षाला सर्वाधिक जागा प्राप्त करत २०२७ साली सत्तेवर आणायचे आहे. माझा पक्ष संघटनेवर तसेच कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. म्हापशातील उत्तर गोवा पक्ष कार्यालयात उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष दयानंद कारबोटकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी उपस्थित मंडळ अध्यक्ष तसेच इतर कार्यकर्त्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री रोहन खंवटे, आमदार केदार नाईक, डिलायला लोबो, प्रेमेंद्र शेट तसेच पक्षातील इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रीपाद नाईक तसेच कारबोटकर यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित केले.
आम्ही करुन दाखवलं...
काँग्रेस पक्षातून भाजपात आलेल्या त्या आमदारांनी फक्त विकासासाठी प्रवेश केला. त्यामुळे हे नवे ते जुने असा भेदभाव न करता एकत्रितपणे काम करा, असाही सल्ला त्यांनी दिला. मागील ६३ वर्षांच्या काळात राज्यात झालेला विकास हा फक्त भाजप सरकारच्या काळात झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले, गोवा स्वच्छ आणि हरित ठेवण्यास प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
'२०२७'साठी कामाला लागा
तानावडे यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या कार्याची पक्ष कशा पद्धतीने दखल घेऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे कारबोटकर असल्याचे म्हणाले. पक्ष संघटनेच्या निवडणुकीतून २०२७ सालच्या विधानसभा निवडणुकीचा आरंभ होत आहे. कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीने काम करावे. याच कामाच्या आधारावर पक्ष पुन्हा सत्तेवर येईल, अशी माहिती तानावडे यांनी दिली. गेल्या निवडणुकीत सरकार विरोधात अनेक आंदोलने झाली तरी सुद्धा पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावरच सत्तेवर आला, असे ते म्हणाले.