विधानसभा निवडणुकीचा काळ जवळ येतोय. फक्त आठ महिन्यांचा कालावधी प्रत्येक मंत्री, आमदाराच्या हाती आहे. डिसेंबरअखेरीस निवडणूक आचारसंहिता आली की, मग सगळेच ठप्प होईल. आपल्या मतदारसंघात अधिकाधिक कामे करून घेण्यासाठी काही आमदार व मंत्री धडपडत आहेत. यापूर्वी जे निवडणुका हरले आहेत, त्यांच्यापैकी काहींना आपण पुन्हा आमदार व्हायलाच हवे, असे वाटते. काही राजकीयदृष्ट्या मतदारसंघात कमकुवत झाले आहेत; पण त्यांना पुन्हा आमदार होण्याची खुमखुमी आहे.
दयानंद मांद्रेकरांपासून महादेव नाईकांपर्यंत किंवा इजिदोर फर्नांडिसांपासून ग्लेन तिकलोंपर्यंत अनेक राजकारणी नव्याने बाशिंग बांधू लागले आहेत. यात मिकी पाशेको, किरण कांदोळकर, दयानंद सोपटे, जयेश साळगावकर, बाबू कवळेकर आदी अनेकांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री व माजी खासदार चर्चिल आलेमाव यांचा टाइम पास होत नाही, असे दिसते. ते अधूनमधून उलटसुलट विधाने करत आहेत. काल पुन्हा त्यांनी तोंड उघडले. आपल्याला कुंकळ्ळीतील काही लोक येऊन भेटले. त्या लोकांनी आपल्याला तू हवा आहेस, असे सांगितले, असा चर्चिलचा दावा आहे. म्हणजे कुंकळ्ळीतून तुम्ही लढा आणि आमदार व्हा, असे आपल्याला एका देवस्थानच्या माणसांसह अनेकांनी सांगितले असल्याचे चर्चिल स्वतःच जाहीर करतात.
चर्चिल किंवा रमाकांत खलप किंवा दयानंद नार्वेकर यांच्या राजकारणाचा काळ यापूर्वीच मागे पडला आहे. नार्वेकर यांनी काळाची पावले ओळखून योग्यवेळी निवृत्ती पत्करली आहे. माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनीही योग्यवेळी वाऱ्याची दिशा ओळखून सक्रिय राजकारणाला 'गुडबाय' केले. काँग्रेस पक्ष सोडून 'टीएमसी' मध्ये जाणे व तिथे अवघ्या काही काळासाठी राज्यसभा खासदार होणे ही लुईझिन यांची घोडचूक होती. त्यांना अपमानित होऊनच ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा आणि खासदारकीचा निरोप घ्यावा लागला. जे राजकीय नेते शेवटपर्यंत काँग्रेस पक्षात राहिले, त्यांना सन्मानाने बाजूला होता आले. गोव्यातील ज्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडला त्यांचे राजकारणातील महत्त्वही नंतर खूप कमी झाले.
आता राजकारण पूर्णपणे बदलले आहे. चोवीस तास लोकसंपर्कात राहावे लागते. कायम लोकांची कामे करतानाच लोकांसाठी खर्चदेखील करावा लागतो. सध्या क्रिकेट टुर्नामेन्टचा काळ सुरू आहे. अनेकजण आमदार चषक स्पर्धा आयोजित करत आहेत. वय व आरोग्य ज्यांना साथ देतेय, तेच आजचे राजकारण करू शकतात. धनशक्तीशिवाय राजकारण सुरू ठेवता येत नाही. राजकीयदृष्ट्या अनेक वर्षे जे टिकले त्यात दिगंबर कामत, माविन गुदिन्हो, सुदिन ढवळीकर, सुभाष शिरोडकर यांचा समावेश होतो.
कामत वर्ष १९९४ मध्ये प्रथम निवडून आले होते, ते कधीच पराभूत झाले नाहीत. वर्ष ९४ मध्ये जिंकून मग कधीच न हरलेला असा एकही आमदार आता विधानसभेत नाही. माविन आणि सुभाष शिरोडकर तर पूर्वीपासून निवडणुका जिंकत आहेत. दोनवेळा ते दोघे पराभूत झाले, तरी पुन्हा मुसंडी मारून वर आले व चांगलेच स्थिरावले. या दोन्ही नेत्यांकडे प्रचंड राजकीय अनुभव आहे; पण दोघेही कधी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री होऊ शकले नाहीत.
सुदिन ढवळीकर वर्ष १९९९ पासून सलगपणे जिंकून येत आहेत. आज देखील ते मडकई मतदारसंघात भक्कमपणे पाय रोवून उभे आहेत. तेही कधी मुख्यमंत्री झाले नाहीत. याउलट चर्चिल आलेमाव यांना मात्र १९ दिवसांसाठी 'सीएम' होण्याची संधी मिळाली होती. ९०च्या दशकात गोव्यात पुलोआचा प्रयोग झाला तेव्हा रमाकांत खलपांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आले होते. खरे म्हणजे खलप त्या पदासाठी पात्र होते, योग्य होते. मात्र, त्या वेळी स्वर्गीय शशिकला काकोडकर वगैरेंनी चर्चिल यांचे नाव सुचविले. काल देखील मीडियाशी बोलताना चर्चिल म्हणाले की, ताई काकोडकर, विनयकुमार उसगावकर वगैरेंना मी जास्त विश्वासू वाटलो, त्यामुळेच मला मुख्यमंत्रिपद दिले गेले होते.
चर्चिल यांना वाटते की, आपण बाणावलीऐवजी कुंकळ्ळीतून लढावे; पण कुंकळ्ळीत युरी आलेमाव हे त्यांच्याच कुटुंबातील सदस्य विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे काल चर्चिलने पुन्हा नवे विधान केले की, मी अजून निर्णय घेतलेला नाही, आरोग्याची स्थिती पाहून मग निर्णय घेईन. वास्तविक चर्चिल यांनी आता विश्रांती घेतलेलीच बरी, असे आजच्या युवा पिढीला वाटत असावे.
Web Summary : Goa's political landscape sees veterans like Churchill Alemao contemplating comebacks as elections loom. While some adapt to changing dynamics, others face dwindling relevance. Younger leaders prioritize constant public engagement and financial investment in constituents.
Web Summary : गोवा के राजनीतिक परिदृश्य में चर्चिल अलेमाओ जैसे दिग्गज चुनाव नजदीक आने पर वापसी पर विचार कर रहे हैं। कुछ बदलती गतिशीलता के अनुकूल हैं, तो कुछ घटती प्रासंगिकता का सामना कर रहे हैं। युवा नेता लगातार सार्वजनिक जुड़ाव और निर्वाचन क्षेत्रों में वित्तीय निवेश को प्राथमिकता देते हैं।