लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नगर नियोजन खात्याचे काही प्रश्न न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगून ते पुढे ढकलण्यात आल्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितल्यामुळे विरोधी आमदारांनी आज, गुरुवारी पुन्हा विधानसभेत गोंधळ घातला. यावेळी गदारोळात कामकाज चालविणे अशक्य झाल्यामुळे सभापती रमेश तवडकर यांना कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.
गुरुवारी कामकाजाची सुरुवात झाली तेव्हा प्रश्नोत्तरे सुरू होण्यापूर्वी नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे उभे राहिले आणि नगर नियोजन खात्यावरील ७ प्रश्न हे न्यायप्रविष्ठ मुद्द्यावर असल्यामुळे पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले. याला विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाचे आमदार वीरेश बोरकर उभे राहिले आणि प्रत्येकवेळी प्रश्न पुढे ढकलता येणार नाहीत, असे सांगितले. तसेच न्यायप्रविष्ठ असलेले प्रश्न विधानसभेत चर्चेला येऊ शकतात, असेही सांगितले. मात्र हे प्रश्न पुढे ढकलण्याच्या भुमिकेवर मंत्री ठाम राहिल्यामुळे विरोधकांनी गदारोळ केला. त्यांनी हौदात धाव घेतली आणि उत्तराची मागणी करून कामकाज रोखन धरले.
सरदेसाईं शांत...
विरोधकांनी गदारोळ करून जेव्हा सभापतींच्या आसनासमोरील हौदात धाव घेतली तेव्हा काँग्रेस, रिव्होल्युशनरी गोवन्स आणि आम आदमी पार्टीच्या आमदारांचा त्यात समावेश होता. परंतु गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी त्यात सहभाग घेतला नाही. ते आपल्या आसनावर शांत बसून राहिले.