बार्देस : गोव्यात बनावट नोटा चलनात आणण्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून म्हापसा पोलिसांनी दोघांना रंगेहाथ अटक केली आहे. एक हजार रुपयांच्या बनावट नोटा राज्यभर चलनात आणण्याचे हे कारस्थान असून पडद्याआड असलेले मोठे सूत्रधार जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत. म्हापसा मार्केटमध्ये या बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या राजू कल्लू खान (२९, रा. उत्तर प्रदेश) यास म्हापसा पोलिसांनी शुक्रवारी रात्री १२ वाजता अटक केली, तर त्याचा सहकारी खुदबू साब नदाफ (२७, रा. कर्नाटक) यास शनिवारी दुपारी ३.३० वाजता अटक करून त्यांच्याकडील एकूण १ हजाराच्या १३ नोटा हस्तगत केल्या. त्यांना न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे दोघेही कळंगुट येथे वास्तव्यास आहेत. म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू कल्लू खान हा मूळ उत्तर प्रदेशमधील युवक आहे. शुक्रवारी बाजारात तो बनावट नोटा चलनात आणत होता. यासंबंधीची तक्रार पोलीस उपनिरीक्षक आल्वितो रॉड्रिग्स यांनी नोंदविली. राजू यास अटक केल्यानंतर त्याने खुदबू साब नदाफ हा आपला साथीदार असल्याचे सांगताच पोलिसांनी त्यालाही शनिवारी सायंकाळी अटक केली. खुदबू साब नदाफ मूळचा कर्नाटकचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. राजू यास लोकांनीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता, या बनावट नोटा बाजारात चलनात आणण्यामागे या संशयितांचा एखादा एजंट असावा आणि हा एजंट या संशयितांमार्फत अशा बनावट नोटा म्हापसा शहराबरोबरच इतरही ठिकाणी वाटत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. सध्या बनावट नोटा मिळण्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. म्हापशात अटक केलेल्या संशयितांशिवाय त्यांचे आणखी साथीदार असावेत, असाही कयास व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास उपनिरीक्षक प्रशांत भगत करत आहेत. (प्रतिनिधी)
बनावट नोटांचा राज्यात सुळसुळाट
By admin | Updated: November 22, 2015 01:36 IST