लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :सनातन संस्था माझ्या मडकई मतदारसंघातून काम करते. त्या संस्थेचे काम काही विरोधकांनी पाहावे, उगाच संस्थेचा द्वेष करू नये, असा सल्ला वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी सायंकाळी पणजीत एका कार्यक्रमावेळी दिला.
सनातन संस्थेविषयी एका सामाजिक कार्यकर्त्याने टीकेचा सूर लावल्याने ढवळीकर यांनी शेवटी आपले भाषण करून आयोजकांचा निरोप घेतला. आपल्याला अशा व्यक्तींसोबत राहायचे नाही, म्हणून आपण शंभू भाऊ बांदेकर यांच्या कार्यक्रमातून बाहेर जातो, आपला पाठिंबा शंभू भाऊंना आहेच, असे ढवळीकर म्हणाले. मात्र सनातन संस्थेविषयी अपप्रचार करणाऱ्यांसोबत आपण राहू शकत नाही, असे ढवळीकर म्हणाले.
मुख्यमंत्र्यांविरुद्ध टीकेस आक्षेप
हा प्रकार सोमवारी मिनेझिस ब्रागांझा सभागृहात घडला. समाजोन्नती संघटनेतर्फे आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यावेळी हे घडले. याच कार्यक्रमावेळी मये गावच्या प्रश्नावरून एका वक्त्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरुद्ध विधान केले, टीका केली. त्यालाही मंत्री ढवळीकर यांनी तिथेच आक्षेप घेतला. आपण उपस्थित असताना मुख्यमंत्र्यांविरुद्ध बोलणे आपण सहन करू शकत नाही, असे ढवळीकर म्हणाले.
सनातन संस्थेचा फर्मागुडी येथे येत्या दि. १६ मे पासून एक मोठा सोहळा होणार आहे. एक लाख लोक त्यात सहभागी होतील. जे काही विरोधक सनातन संस्थेविषयी द्वेषपूर्ण बोलतात, त्यांच्या कार्यक्रमाला कुणीच उपस्थित असत नाही हे मी स्वतः पाहिले आहे. सनातन संस्था हिंदू समाजाच्या कल्याणासाठी अध्यात्माचे काम करते. आध्यात्मिक प्रसार हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू आहे. त्या कामाविषयी काहीही ठाऊक नसताना काहीजण बोलतात, ते बोलण्यासाठी हे व्यासपीठ नव्हे. - सुदिन ढवळीकर, वीजमंत्री.