लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : कोणतीही व्यक्ती लहान किंवा मोठी, हुशार किंवा कमी हुशार नसते. प्रत्येकाकडे आपले वेगळे विचार, बुद्धिचातुर्य व कल्पकता असते. त्याचा वापर विकसित भारतासाठी करताना योगदान द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारतासाठी आखलेल्या संकल्पनेत प्रत्येक देशवासीयांचा समावेश केला असून, आजचे विद्यार्थी हे उद्याच्या विकसित भारताचे शिल्पकार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.
साखळी रवींद्र भवनात इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र व साखळी रवींद्र भवन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विकसित भारत विषयावर चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, कला व संस्कृती खात्याचे सचिव संतोष सुखदेवे (आयएएस), इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे साखळीतील संचालक अरुण रेड्डी व इतरांची उपस्थिती होती.
देशाच्या आजपर्यतच्या घोडदौडीत समाजातील विविध स्तरांवर काम करणाऱ्या लोकांनी आपल्या परीने योगदान दिलेले आहे. यापुढे देशाला नवीन उंचीवर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध संकल्पना समोर ठेवल्या आहेत. या संकल्पना, योजनांचा वापर करून लोकांनी विकसित भारतात योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी केले.
२०० स्पर्धकांचा सहभाग
यावेळी तीन गटांमध्ये घेण्यात आलेल्या विकसित भारत या विषयावरील चित्रकला स्पर्धेत सुमारे २०० स्पर्धकांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात आपल्या कार्यक्षेत्राबरोबरच विविध समाजसेवी कार्यात योगदान दिलेल्या पृथ्वीराज गावस, शरदचंद्र नाईक, राधाप्रसाद बोरकर, रत्नदीप सावंत, प्रा. अनिल वेर्णेकर, संतोष नाईक, शिवानंद पेडणेकर, सुरेश परब, श्रीमंत गोसावी, आबा जोशी, अमित नाईक, स्नेहा देसाई, नरेश दातये, अल्लाउद्दीन व रविराज च्यारी यांचा मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.