सद्गुरू पाटील-पणजी : दिल्ली येथील जामिया मिल्लीया इस्लामिया या नामांकित सिने संस्थेत अनेक कलाकार घडले. या संस्थेत शिक्षण घेतलेले शेकडो विद्यार्थी पत्रकारिता, चित्रपट व अन्य क्षेत्रांमध्ये वावरत आहेत. बरखा दत्त या प्रसिद्ध महिला संपादकही जामिया मिल्लीया इस्लामिया या संस्थेत शिकल्या आहेत. बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरूख खान हा देखील जामिया मिल्लीया इस्लामिया या सिने संस्थेचा विद्यार्थी होता. मात्र, तो बेशिस्त होता व त्याने अर्ध्यावरच या संस्थेचा निरोप घेतला. हा अनुभव जामिया मिल्लीया इस्लामिया या संस्थेचे प्राध्यापक बी. दिवाकर यांनी सांगितला. दिवाकर यांच्या जामिया मिल्लीया इस्लामिया संस्थेच्या विद्यार्थ्यांनी ‘श्रीनिवास’ हा सिनेमा तयार केला असून प्रा. दिवाकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा सिनेमा इफ्फीसाठी निवडला गेला आहे. शाहरूखने अर्ध्यावरच आमच्या संस्थेतील शिक्षण सोडले तरी, तो खूप यशस्वी झाला. आमचे आशीर्वाद निश्चितच त्याच्यासोबत आहेत, असे दिवाकर म्हणाले. चित्रपट क्षेत्रातील कलाकाराने खूप यशस्वी होण्यासाठी सिने संस्थेतच शिक्षण घेणे गरजेचे असते काय, असे दिवाकर यांना पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले की असे काही नाही. मुळात पॅशन महत्त्वाची असते. एखाद्या विषयाबाबत जर एखाद्यास प्रचंड पॅशन असेल तर तो त्या विषयात प्रावीण्य मिळवितो, यशस्वी होतो. दिवाकर म्हणाले, की जामिया मिल्लीया इस्लामिया या सिने संस्थेकडे जागा फक्त पन्नास आहेत; पण प्रवेशासाठी दीड हजार विद्यार्थ्यांकडून अर्ज येतात. आम्ही यापैकी कोणत्या विद्यार्थ्यांना सिनेमाबाबत खूप पॅशन आहे याचा शोध घेतो व त्यातून मग पन्नास विद्यार्थी निवडतो. यावेळी सत्यजित गानू, अनिषा सैगल आदी उपस्थित होते.
शाहरूख होता बेशिस्त विद्यार्थी...
By admin | Updated: November 24, 2014 01:59 IST