पणजी : सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची गोव्यातही अभ्यासाअंती अंमलबजावणी केली जाईल. त्यासाठी आम्ही तयारी करू लागलो आहोत. सातवा वेतन आयोग लागू करणे हे काम आव्हानात्मक आहे; पण आम्ही या आव्हानास सामोरे जाऊ, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की जनतेला ज्या गोष्टी द्यायच्या असतात त्या आम्ही देऊ. त्याबाबत आम्ही मागे राहणार नाही. आतापर्यंत आमच्याच सरकारने जनतेला विविध गोष्टी दिल्या आहेत. अनेक योजना मार्गी लावल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी जी तरतूद करायला हवी, ती आम्ही करू. सध्या विचार सुरू आहे. डिफेन्स एक्स्पो दरम्यान, बेतूल येथे होणाऱ्या डिफेन्स एक्स्पोबाबत पत्रकारांनी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की ती जागा कायमस्वरूपी तत्त्वावर आम्ही संरक्षण मंत्रालयाला दिलेली नाही. संरक्षण मंत्रालयाने कायमस्वरूपी तत्त्वावर मागितली होती. आपली संरक्षणमंत्री पर्रीकर यांच्याशी चर्चा झाली आहे. ती एका वर्षासाठी आणि ती देखील फेब्रुवारी महिन्यातील पाच दिवस डिफेन्स एक्स्पो आयोजित करण्यासाठी देण्यात आली आहे. मात्र, पहिल्या वर्षी डिफेन्स एक्स्पो बऱ्यापैकी पार पडला व या प्रदर्शनाची गरज लोकांना व सरकारला पटली तर मग पुढे दरवर्षी पाच दिवसांसाठी ही जागा देता येईल. (खास प्रतिनिधी)
सातव्या वेतन आयोगाचे आव्हान पेलू : पार्सेकर
By admin | Updated: November 21, 2015 02:10 IST