पणजी : ‘जैका’-लुईस बर्जर लाच प्रकरणात अटक झाल्यानंतरही आपले कोणीही काहीच बिघडवू शकत नाही, अशा थाटात वावरणारे ‘जैका’चे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर हे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना क्राईम ब्रँचमध्ये चौकशीला सामोरे जाताना पाहून अक्षरश: नरम पडले. गुरुवारीही वाचासुंदर यांची अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी करण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ जुलै रोजी अटक करण्यात आलेले वाचासुंदर हे चौकशीला योग्य प्रतिसाद देत नव्हते. क्राईम ब्रँचने आपल्याला विनाकारण अटक केली आहे. आपल्या कारकिर्दीत कोणतेही लाच प्रकरण घडलेले नाही. तसे झाले असे आपण म्हणत असाल, तरी आपल्याला ते ज्ञात नाही, असे सांगणारे वाचासुंदर बुधवारी मात्र एकदम नरम पडले. बुधवारी सायंकाळी ५.१५ वाजता त्यांना कोठडीतून क्राईम ब्रँचमध्ये चौकशीसाठी आणण्यात आले, तेव्हा क्राईम ब्रँच कार्यालयात शिरतानाच त्यांनी जे काही पाहिले, त्यानंतर ते काही क्षण स्तब्धच राहिले. माजी मुख्यमंत्री कामत यांना समोर बसवून क्राईम ब्रँचचे अधिकारी त्यांना लुईस बर्जर लाच प्रकरणात प्रश्न करीत होते आणि जबाब नोंदवून घेत होते. ६.३० वाजल्यानंतर कामत निघूनही गेले; परंतु वाचासुंदर यांची चौकशी चालूच होती. या संपूर्ण चौकशीदरम्यान ते नरम पडलेले जाणवत होते. गुरुवारी त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली, त्या वेळीही तीच परिस्थिती होती. वाचासुंदर यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी पणजी सत्र न्यायालयात दुपारी २.३० वाजता सुनावणी होणार आहे. क्राईम ब्रँचकडूनही बाजू मांडली जाणार आहे. न्यायालय युक्तिवाद ऐकून घेऊन निवाडा राखून ठेवण्याची शक्यता आहे. दरम्यान, निरीक्षक दत्तगुरू सावंत हेच या प्रकरणाचे तपास अधिकारी राहणार असल्याचे क्राईम ब्रँचचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
दिगंबर कामतना पाहून वाचासुंदरांची बसली ‘वाचा’!
By admin | Updated: July 31, 2015 02:10 IST