लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : झुवारी पुलाच्या दुसरी चौपदरी लेन येत्या २२ ते २४ डिसेंबर यांदरम्यान खुली होईल, अशी शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या पुलाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.
नाताळ, नववर्षानिमित्त आगामी काळात वाहतूक प्रचंड वाढणार आहे. त्यामुळे दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या या नवीन पुलाची दुसरी चौपदरी लेन लवकर खुली होणे आवश्यक आहे. या चौपदरी लेनवर 'लोड टेस्टिंग' झालेले आहे. मध्यंतरी पाऊस झाल्याने हॉटमिक्सिंगचे काम आठवडाभर बंद ठेवण्यात आले होते. परंतु आता तेही हातावेगळे होईल. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपलब्धतेनुसार या दुसऱ्या लेनच्या उद्घाटनाची तारीख निश्चित केली जाईल.
या आठ पदरी पुलाची एक चौपदरी लेन यापूर्वीच खुली झालेली आहे. आता ही दुसरी लेन खुली झाल्यानंतर अवजड वाहनांचाही मार्ग मोकळा होईल. जुना पूल होता, तेव्हा आगशी व कुठ्ठाळी या भागात मोठी वाहतूक कोंडी होत असे. ही कोंडी आता दूर होईल.