पणजी : राज्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पाण्यात उतरणाऱ्या विमानांची (सी प्लेन) सेवा सुरू करण्याच्या मुंबईच्या मरिटाइम एनर्जी हेली एअर सर्व्हिसेस (मेहर) या कंपनीने दिलेल्या प्रस्तावाला चालना मिळाली आहे. येत्या आठवड्यात मांडवीत या विमानसेवेची प्रात्यक्षिके घेतली जातील. दाबोळी विमानतळ ते दोनापावल, विमानतळ ते कोको बीच (नेरूल), विमानतळ ते मिरामार अशा तीन-चार हवाई मार्गांवर ही सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दोनापावल, कोको बीच, मिरामार या ठिकाणी तरंगते धक्के उभारावे लागतील. मेहर या कंपनीने महाराष्ट्रात नागपूर ते रामटेकमधील खिंडसी दरम्यान अलीकडेच अशा प्रकारचा प्रयोग केला आहे. नागपूर-खिंडसी-नावेगाव-नागपूर सर्किट अशी ही सेवा आहे. मुंबई ते लोणावळा आणि मुंबई ते शिर्डी दरम्यान कंपनीची सी प्लेन कार्यरत आहेत. पैसे खर्च करण्याची ऐपत असलेले देशी-विदेशी पर्यटक हे या सेवेचे उद्दिष्ट आहेत. नागपूर विमानतळावरून हे विमान सुटते आणि खिंडसी तलावात तरंगत्या धक्क्यावर उतरते. तेथून स्पीड बोटीने पर्यटकांना किनाऱ्यावर आणले जाते. अशाच पद्धतीची व्यवस्था मांडवी नदीत करण्याची योजना आहे. ही विमाने लहान असतात. २५०० ते ४००० फूट इतक्याच उंचीवरून धावतात. (प्रतिनिधी)
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सी प्लेन!
By admin | Updated: November 17, 2014 02:00 IST