पणजी : इस्लामिक स्टेट्स आॅफ इराक अॅण्ड सिरिया संघटनेचा (इसिस) गोव्यातील नौदलाचा तळ उडविण्याचा डाव होता. तसेच विदेशी पर्यटकांवर हल्ला करण्याचाही कट होता, अशी माहिती महाराष्ट्र एटीएसच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या दरम्यान अतिरेक्यांचे मडगावमध्ये वास्तव्य होते, अशी माहिती उघड झाली आहे. जागतिक पर्यटनस्थळ असल्यामुळे गोवा हे अतिरेक्यांचे लक्ष्य होतेच. इसिसनेही पर्यटकांवर हल्ला करण्याचा कट रचला होता व त्यासाठी या संघटनेचे अतिरेकी कार्यरतही होते. शिवाय गोव्यातील महत्त्वाची लष्करी केंद्रेही उद्ध्वस्त करण्याचे त्यांचे लक्ष्य होते. वास्कोतील नौदल केंद्राचाही त्यात समावेश होता. महाराष्ट्र एटीएसच्या कोठडीत असलेल्या इसिसच्या अतिरेक्यांच्या चौकशीदरम्यान ही गोष्ट उघडकीस आली. इसिसच्या भारतातील कारवायांचा मास्टरमाइंड असलेला शफी अरमार ऊर्फ युसूफ हा युवकांना इसिसच्या जाळ्यात ओढून घेत होता. त्यालाच अटक करण्यात आल्यामुळे त्याच्या सर्व कारवायांचाही शोध एटीएसने लावला आहे. मुदब्बीर शेख व खलिद अहमद यांनाही एनआयएने अटक केल्यामुळे इसिसचा पूर्ण डाव फसला. (प्रतिनिधी)
नाविक तळ होता इसिसचे लक्ष्य
By admin | Updated: February 3, 2016 02:47 IST