पणजी : तहलका मासिका गोव्यात झालेल्या थिंक फेस्टवेळी तरुण तेजपाल याच्या सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार झाल्या प्रकरणी गोवा पोलिसांनी हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट दी निरो यास प्रश्नावली पाठवली होती. आता पाच महिन्यांनंतर त्या प्रश्नावलीला दी निरो याने प्रतिसाद दिला आहे.थिंक फेस्टवेळी लैंगिक अत्याचार झालेली महिला पत्रकार रॉबर्ट दी निरोसाठी लायेजन अधिकारी म्हणून काम पहात होती. त्या सोहळ्यावेळी दि निरो याच्या गोव्यातील निवासाच्या ठिकाणाहून बांबोळी येथील हॉटेलमध्ये म्हणजे सोहळ्याच्या ठिकाणी निरो आणि त्याची मुलगी ड्रेन यांना घेऊन येणे तसेच नंतर त्यांना पोहचवणे अशी जबाबदारी या महिला पत्रकारावर होती. पोलिसांनी याविषयी विचारलेल्या माहितीस प्रतिसाद म्हणून रॉबर्ट दी निरो या अभिनेत्याच्या कार्यालयातून एक इमेल संदेश गोवा पोलिसांना आता आलेला आहे, असे सुत्रांनी सांगितले. आपल्यासाठी सदर महिला पत्रकार लायेजन अधिकारी म्हणून थिंक फेस्ट सोहळ्यावेळी काम पहात होती यावर रॉबर्ट दी निरो याने शिक्कामोर्तब केले असल्याचे सुत्रांनी सांगितले. सहकारी महिला पत्रकारावर हॉटेलच्या लिफ्टमध्ये बलात्कार केल्याचा तहलका मासिकाचा माजी संपादक तेजपाल याच्यावर आरोप आहे. गोवा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्रही सादर केले आहे. पोलिसांकडून तेजपाल प्रकरणी पुरवणी आरोपपत्र सादर केले जाणार असून त्या आरोपपत्रावेळी दी निरो याने इमेलद्वारे दिलेली जबानी वापरली जाणार असल्याचे सुत्रांकडून कळते. महिला पत्रकारावर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी रॉबर्ट दी निरो हे एकमेव विदेशी साक्षिदार ठरणार आहेत.(खास प्रतिनिधी)
तेजपाल प्रकरणी अखेर हॉलिवूड अभिनेत्याचा प्रतिसाद
By admin | Updated: May 7, 2014 17:51 IST