फोंडा : खनिज वाहतुकीच्या दरासंबंधी ट्रकमालक संघटनेने चालविलेल्या आंदोलनात सरकार अजूनही खाण कंपनीचे हित सांभाळत असून सरकारला ट्रकमालकांचे सोयरसुतक नाही. सध्या खाण कंपनी देत असलेला वाहतुकीचा दर कोणत्याही परिस्थितीत परवडणारा नसून रास्त दर मिळेपर्यंत ट्रकमालकांचे आंदोलन सुरू राहील. त्यातही सरकार जर खाणबंदी लागू झाली त्यावेळचा म्हणजेच २0१२ साली डिझेलचा दर ३९.६0 पैसे असताना दिला जाणारा ११ रुपये २७ पैसे प्रति टन प्रति किलोमीटर दर देण्यास तयार असेल, तर ट्रकमालक संघटना आंदोलन मागे घेऊन खनिज वाहतूक सुरू करेल, असे प्रतिपादन अखिल गोवा ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ गावस यांनी उसगाव, वडाकडे येथे केले. खनिज वाहतुकीच्या दरासंबंधी मुख्यमंत्री तसेच खाण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेचा तपशील संघटनेच्या सदस्यांना देताना ते बोलत होते. या वेळी भोला गावकर, बालाजी गावस, शिवदास माडकर यांच्यासह मोठ्या संख्येने ट्रकमालक उपस्थित होते. खनिज वाहतुकीसाठी रास्त दर मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याच्या निर्णयाचे ट्रकमालकांनी जोरदार समर्थन केले. गावस पुढे म्हणाले की, कालपरवाच मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून बोलावलेल्या ट्रकमालक व खाण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री सेसा कंपनीच्या वतीनेच बोलले. त्यात मुख्यमंत्र्यांनी ट्रकमालकांना खाण व्यवसाय बंद पडू देऊ नका, अशी कळकळीची विनंती केली. खाण व्यवसाय सुरू व्हायचा असेल, तर ट्रकमालकांनी थोडी कळ सोसून कंपनीला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले; मात्र ज्या खाण कंपनीने एवढी वर्षे गोव्याला लुटले, त्या कंपनीला ट्रकमालकांच्या हितासाठी थोडी कळ काढण्याची विनंती करण्यास ते तयार नाहीत. सरकार ट्रकमालकांना कळ काढण्याची विनंती करते; मात्र ट्रकमालकांची परवड थांबवण्यासाठी कंपनीने तडजोड करावी, असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी काढला नाही. सध्या डॉलरचा दर उतरला आहे, याची संघटनेलाही कल्पना आहे. (पान ४ वर)
२0१२चा दर हवा!
By admin | Updated: December 15, 2015 01:42 IST