लोकमत न्यूज नेटवर्क, होंडा : 'सत्तरीच्या लोकांचा विकास करणे व त्यांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. आम्ही वन क्षेत्रातील लोकांचा वन अधिकाऱ्यांशी कधी संघर्ष होणार नाही, याची काळजी घेऊ. वन क्षेत्रातील लोकांच्या अधिकारांचे पूर्ण संरक्षण केले जाईल,' असे आरोग्य मंत्री तथा वाळपईचे आमदार विश्वजीत राणे यांनी काल गुरुवारी सांगितले.
'मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आणलेल्या नवनव्या कायद्यांमुळे लोकांना सुरक्षाकवच प्राप्त झाले आहे. लोकांची घरे कायदेशीर होतील', असेही मंत्री राणे म्हणाले. ते म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांच्या हितासाठी देशभर काम करतात.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही लोकसेवेसाठी वावरतात. आम्ही सगळे जण मिळून बेरोजगारीच्या समस्येवर तोडगा काढू. भाजप सरकारच्या माध्यमातून आम्ही सगळे जण लोकसेवा करत आहोत. सत्तरी तालुक्यात आरोग्य खाते विकासाचे अनेक प्रकल्प उभे करणार आहे. अनेक आधुनिक वैद्यकीय सुविधांची निर्मिती केली जाईल,' असेही राणे म्हणाले.
दरम्यान, सावर्डे येथे गुरुवारी गणेश चतुर्थी भेट कार्यक्रम झाला. लोकांना चतुर्थीच्या निमित्ताने साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी विश्वजीत राणे यांनी उपस्थित लोकांशी संवाद साधला.
सत्तरीच्या विकासाला सहकार्य करा
आरोग्यमंत्री राणे म्हणाले की, 'माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, मनोहर पर्रीकर आदींनी दाखविलेली विकासाची वाट आमचे सरकार पुढे नेत आहे. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्यात विकासाची मुहूर्तमेढ रोवली. मग, प्रतापसिंग राणे, पर्रीकर व आता विद्यमान मुख्यमंत्री सावंत हे विकासाचा रथ पुढे नेत आहेत. सत्तरीच्या लोकांनीही या विकास कामांसाठी सहकार्य करावे', असे राणे म्हणाले.