बार्देस : बागा समुद्रकिनाऱ्यावरील शॅकसाठी वाहन मार्गासाठी हडफडे- नागवाचे पंचसदस्य केल्फा फर्नांडिस यांनी संरक्षक भिंत पाडल्याप्रकरणी कळंगुटचे आमदार मायकल लोबो व ग्रामस्थांनी गेल्या आठवड्यात काम बंद पाडले होते. तसेच कंत्राटदारास ही भिंत पुन्हा बांधून देण्यास सांगितले होते. परंतु भिंत बांधून न दिल्याने रविवारी लोकांनी सभा घेऊन निषेध व्यक्त केला. शिवाय कोणत्याच परिस्थितीत रस्ता करण्यास देणार नाही, असा ठराव घेण्यात आला. बागा समुद्रकिनारी हडफडे-नागवा पंचायतचे पंचसदस्य केल्फा फर्नांडिस यांचा बेकायदा शॅक आहे. त्या ठिकाणी जाण्यास पायवाट आहे. त्यामुळे वाहने नेण्यास मिळत नाही. तसेच अनेक वर्षांपासूनचा ‘झेवियर रिटिरीज हाउस’ आहे आणि या डोंगरावरील माती, दगड, झाडे पावसाच्या दिवसात कोसळून पडत आहेत. त्यामुळे या हाउसला धोका बसण्याचा संभव होता. त्यासाठी आमदार मायकल लोबो यांनी पुढाकार घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत १ कोटी २५ लाख रुपये खर्चून या डोंगरालगत संरक्षक भिंत बांधली. ही संरक्षक भिंत पाडून पंचसदस्य केल्फा फर्नांडिस यांनी सुमारे ६ मीटर रुंद आणि ५० मीटर लांब रस्ता करण्यास गेल्या आठवड्यापासून सुरुवात केली. ही भिंत दोन रात्रीत जमीनदोस्त केली. हा रस्ता करण्यासाठी जलस्रोत खात्याच्या जेसीबीचा कंत्राटदाराने वापर केला होता. त्यासाठी गेल्या आठवड्यात या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. मायकल लोबो आणि झेवियर रिटीरिज हाउसचे डायरेक्टर फादर रोनाल्ड डिसोझा यांनी कंत्राटदाराला ही संरक्षक भिंत बांधून देण्यास सांगितले. फादर डिसोझा यांनी याप्रकरणी हणजूण पोलिसांत तक्रार केली होती. आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे येथील लोकांनी रविवारी निषेध सभा घेतली. या ठिकाणी रस्ता न करता आणि वाहने जाण्यास मिळू नये म्हणून प्रत्येकाने पैसे काढून संरक्षक भिंत बांधावी. आपण पुन्हा सरकारकडे प्रयत्न करेन. ते सफल न झाल्यास लोकांनीच एकत्र येऊन काम करून घ्यावे, असे मायकल लोबो यांनी सांगितले. त्यावर लोकांनी ज्यांनी ही संरक्षक भिंत पाडली त्यांनी ती बांधून द्यावी, अशी सूचना केली. या वेळी सभेला नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्य शॉन मार्टिन्स, अॅड. आयरिश रॉड्रिगीस, प्रज्वल साखरदांडे, हडफडे-नागवाच्या सरपंच सुषमा नागवेकर, अॅड. योगेश नाईक, फादर मिरांडा, फादर रॉड्रिगीस, फादर सावियो (जमिनीचे इन्चार्ज) व इतर उपस्थित होते. अॅड. आयरिश रॉड्रिगीस, अॅड. योगेश नाईक यांनी कायद्यानुसार जे काही नियम आहेत आणि त्या नियमांनुसार हा रस्ता करण्यात येत आहे. तसेच संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे त्याची माहिती करून दिली. या रस्त्याचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे सांगितले. तसेच प्रज्वल साखरदांडे यांनीही विचार मांडले. (प्रतिनिधी)
संरक्षक भिंत न बांधल्याने निषेध
By admin | Updated: March 23, 2015 02:07 IST