लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : धारगळ येथील डेल्टा कॉर्प कंपनीच्या प्रस्तावित हॉस्पिटॅलिटी प्रकल्पाला गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (आयपीबी) मान्यता कमांड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (काडा) कडून मंजुरी मिळाल्यानंतरच दिली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी धारगळ येथील तिलारी प्रकल्पासाठी अधिसूचित असलेली जागा डेल्टा कॉर्प कंपनीच्या प्रस्तावित हॉस्पिटॅलिटी प्रकल्पासाठी अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय कसा घेतला? असा प्रश्न प्रश्नोत्तर तासात विचारला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे वरील उत्तर दिले.
आलेमाव म्हणाले की, तिलारी प्रकल्पाचे पाणी राज्यातील बार्देश, पेडणे व डिचोली या तीन तालुक्यांना मिळते. मात्र धारगळ येथे या प्रकल्पासाठीची जमीन डेल्टा कॉर्प कंपनीला हॉस्पिटॅलिटी प्रकल्प उभारण्यासाठी दिली आहे. यात मल्टिप्लेक्स, हॉटेल्स, हॉल तसेच अन्य सुविधा आहेत. तसा प्रस्ताव गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडे आल्यानंतर त्यांनी त्याला मंजुरी दिली आहे. प्रत्यक्षात ही मंजुरी देताना 'काडा'ला विश्वासात घेणे अपेक्षित होते. मात्र ते झालेले नाही, असे त्यांनी सांगितले.
जमिनीचे संवर्धन
धारगळ येथील तिलारी प्रकल्पाच्या कमांड एरीया मधील जागा ही सुरक्षित राहावी हा आमचा हेतू आहे. त्यामुळे काडाने परवानगी दिली तरच प्रकल्पावर प्रक्रिया अपेक्षित आहे. 'काडा'ची याविषयी अजूनही बैठक झाली नसून ती १५ ऑगस्टपर्यंत होईल, असे जलस्त्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
मोपा विमानतळामुळे पर्यटनात वाढ
मुख्यमंत्री म्हणाले, की डेल्टा कॉर्प कंपनीला हा प्रकल्प उभारण्यासाठी सरकारने नव्हे तर शेतकऱ्यांनी आपली जागा दिली आहे. 'काडा'ने मान्यता 3 दिल्यानंतरच आयपीबीची या प्रकल्पासाठी मंजुरी दिली जाईल. मोपा विमानतळामुळे त्या भागातील पर्यटनात वाढ होत असल्याने हा प्रकल्प येत असल्याचे त्यांनी सांगितले.