लोकमत न्यूज नेटवर्क, उसगाव: धाटवाडा-उसगाव भागात नेस्ल्ये औद्योगिक आस्थापनेच्या समोरील बेळगाव-फोंडा महामार्गाच्या दुतर्फा मालवाहू वाहने पार्क करून ठेवली जात आहेत. या मालवाहू वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, अपघातांना निमंत्रण मिळत आहे. या महामार्गाचे येथे चौपदरीकरण करण्यात आले आहे. त्या रुंदीकरण केलेल्या ठिकाणी औद्योगिक आस्थापनांना माल घेऊन येणारी अवजड वाहने पार्क करून ठेवली जातात.
या महामार्गाच्या दुतर्फा मालवाहू वाहने पार्क करून ठेवली जात असल्याने येथून होणाऱ्या जलद वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अनधिकृतपणे पार्क करून ठेवलेल्या या मालवाहू वाहनांपैकी एखादे वाहन अचानक रस्त्यावर आणले जाते, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सव काळात बेळगावात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि विनाअपघात व्हावा, याकरिता बेळगाव-फोंडा महामार्गावर धाटवाडा-उसगाव येथे रस्त्याच्या दुतर्फा पार्क करून ठेवण्यात येणाऱ्या सर्व मालवाहू वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून होत आहे. गणेशोत्सव सुरू असल्याने अद्यापही बेळगावकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ सुरूच आहे.
कायद्याचे उल्लंघन
सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी मोटार वाहन कायदा आणि संबंधित नियमांनुसार राष्ट्रीय महामार्गावर पार्किंग करण्यास सामान्यतः मनाई आहे. राष्ट्रीय महामार्ग नियंत्रण (जमीन आणि वाहतूक) कायदा, २००२ नुसार महामार्गाच्या जमिनीवर अनधिकृतपणे वाहने पार्किंग करून ठेवण्यास मनाई आहे. स्थानिक वाहतूक पोलिसांनी या भागात महामार्गाच्या दुतर्फा धोकादायकपणे पार्क करून ठेवण्यात येणाऱ्या मालवाहतूक वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांसह वाहनचालक करीत आहेत.
कोटधाटवाडा उसगाव येथील महामार्गावर नियमित पोलिस गस्त असायला हवी. जे वाहनचालक महामार्गाच्या दुतर्फा मालवाहू वाहने पार्क करून ठेवतात, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हायला हवी. यामुळे रस्ता वाहतुकीस खुला होईल. अपघाताचा धोका टळेल. उसगावातील लोकांना निर्भयपणे दुचाकीवरून कामावर जा-ये करता येईल. - राजेंद्र प्रभू, निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी, झरीचावाडा उसगाव.
थाटवाडा उसगाव येथे नेस्ले कंपनीजवळ अवजड वाहनांचे बेकायदा पार्किंग होत असल्याने येथे अपघाताची शक्यता वाढली आहे. या रस्त्याने बेळगावकडून वेगात येणाऱ्या वाहनांना रस्त्याच्याकडेला पार्किंग केलेल्या अवजड वाहनांचा अंदाज येत नाही. यामुळे वाहतुकीला अडथळा होतो व महामार्गावरील नियमित वाहतूकही अडचणीत येते. - प्रेमानंद नाईक, सामाजिक कार्यकर्ते, उसगाव.
उसगाव औद्योगिक वसाहतीमध्ये येणाऱ्या मालवाहू ट्रक व अन्य अवजड वाहनांसाठी कायमस्वरुपी वाहनतळ नसल्याने ही वाहने औद्योगिक क्षेत्राच्या बाहेर महामार्गाच्या दुतर्फा पार्क करून ठेवली जातात. या वाहनांमुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा होतो. त्यामुळे येथे वाहनतळ करण्याची मागणी होत आहे. पण ती अद्याप पूर्ण झालेली नाही. - प्रांजली सामंत, युवा सामाजिक कार्यकर्त्या, बाराजण उसगाव.