ऑनलाइन लोकमतपणजी, दि. १८ - गोव्यातील एकमेव पणजी महापालिकेत गेले काही महिने घोटाळ्यांचे सत्र चालू असून एकापाठोपाठ उघडकीस आलेल्या लाखो रुपयांच्या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर बोलावलेली मनपाची विशेष बैठक बरीच गाजली. तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत संशयित कर्मचारी, अधिकारी यांची परेड झाली. सोपो वसुलीतील गोलमाल आणि पे पार्किंग घोटाळ्यात संशय असलेला अव्वल कारकुन नारायण कवळेकर याला सर्वांसमोर उभे करुन जाब विचारण्यात आला. सभागृहातील वातावरण यावेळी बरेच तापले. घोटाळ्यांमध्ये गुंतलेल्यांना निलंबित करुन पोलिस तक्रार करावी आणि प्रकरणे लोकायुक्तांकडे सोपवावी, अशी मागणी संतप्त नगरसेवकांनी केली. सोपो वसुलीतील ४६ लाखांचा घपला, पे पार्किंगचा १0 लाखांचा घोटाळा आणि रिलायन्स फोर जी केबल प्रकरणी ३२ लाखांचा घोटाळा गेले काही दिवस गाजत आहे. या पार्श्वभूमीवर ही विशेष बैठक बोलावण्यात आली होती.
सोपो घोटाळा तीन वर्षांपासूनचासोपो घोटाळा २0१३-१४ पासूनच आहे, असे चौकशीत उघड झाल्याची माहिती आयुक्तांनी दिली आणि सर्वांनाच धक्का बसला. २0१३-१४ चा साडेतीन लाख रुपये सोपो येणे आहे. २0१४-१५ चा ७ लाख ३७ हजार २५१ रु पये सोपो येणे आहे. २0१५-१६ चे ६२ लाख रुपयांचे कंत्राट होते परंतु केवळ ३0 लाख रुपये तिजोरीत आलेले आहेत, अशी आकडेवारी आयुक्तांनी देताच नगरसेवक संतप्त बनले. या प्रकरणाच्या मुळाशी जायचे असेल तर नारायण याला आधी निलंबित करा, असा आग्रह नगरसेवक उदय मडकईकर व इतरांनी धरला.
संशयित कर्मचारी, अधिकाऱ्यांची परेडसोपो वसुलीतील गोलमाल आणि पे पार्किंग घोटाळ्यातील संशयित अव्वल कारकुन नारायण कवळेकर याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करुन त्याला भंडावून सोडण्यात आले परंतु आपला या प्रकरणात काहीच सहभाग नाही, असे पालुपद नारायण याने चालूच ठेवले. सोपो वसुली झालेली नाही याबाबत फाइलवर नोटिंग आहे, असा त्याचा दावा होता. रिलायन्स फोर जी केबल घोटाळा प्रकरणात अभियंता जॉन आब््रयु याला सर्वांसमोर उभे करण्यात आले. २0 किलोमिटर खोदकाम करण्यासाठी २0१५ मध्ये केवळ १0 लाख रुपये शुल्क आकारण्यात आले. ६00 रुपये प्रती मिटरप्रमाणे १ कोटी २0 लाख रुपये मनपाच्या तिजोरीत यायला हवे होते ते कुठे गेले. ६00 रुपये दर कोणी ठरवला आदी प्रश्न करुन जॉन यालाही फैलावर घेण्यात आले. या प्रकरणात कॅशियरला हजर करा, असा हेका सर्वांनी धरला परंतु तो आधीच कार्यालय सोडून घरी गेला होता.