लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोवा मल:निस्सारण महामंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या यलो मस्टर्ड रंगाच्या व जीपीएस यंत्रणा असलेल्याच टँकरना सांडपाण्याची वाहतूक करण्यास परवानगी आहे. बेकायदेशीर सांडपाण्याची वाहतूक करणारे टँकर जप्त केले जातील, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिला.
राज्यातील सांडपाणी व्यवस्थापन या विषयावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिला. उघड्यावर सांडपाणी सोडल्यास त्यावर कारवाई होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
मल:निस्सारण महामंडळ सशक्त करणार
मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यात सांडपाणी ही समस्या म्हणून पुढे आहे. सांडपाणी हा विषय हाताळणारे गोवा मलः निस्सारण महामंडळ हे सशक्त केले जात असून कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली आहे. महामंडळाकडे नोंदणीकृत व जीपीएस यंत्रणा बसलेल्या टँकरनाच सांडपाणी वाहतूक करण्यास परवानगी आहे. या टँकरना यलो मस्टर्ड रंगाचा टॅग दिला आहे. यामुळे बेकायदेशीरपणे सांडपाण्याची वाहतूक होणार नाही. मात्र बेकायदेशीरपणे सांडपाण्याची वाहतूक केली तर टैंकर जप्त केला जाईल असे त्यांनी सांगितले.
अॅपवर करा बुकिंग
जर कुणाला सांडपाण्याची वाहतूक करण्यासाठी टँकर हवा असेल तर ते आता ऑनलाइन बुक करू शकतात. गोवा मल:निस्सारण महामंडळाकडे टैंकर बुकिंग करता येईल, यासाठी अॅप तयार केला असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
राज्यातील मलः निस्सारण प्रकल्पाची जोडणी व्यवस्थित नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी सांडपाणी रस्ता, शाळा, इस्पितळ, हॉटेल, रहिवासी इमारतींसमोर चेंबरमधून बाहेर आलेले दिसून येते. मलः निस्सारण प्रकल्प स्थापन करणे पुरेसे नसून त्याची देखभालही आवश्यक आहे. - युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते
साळ नदीत सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे नदी प्रदूषित होत आहे. साळ नदीवर मासेमारीसाठी अवलंबून असलेल्या मच्छीमारांनाही त्याचा फटका बसत आहे. एकूण राज्यातील सांडपाणी व्यवस्थापनाचे ऑडिट व्हावे. - एल्टन डिकोस्ता, आमदार केपे