लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : मातृशक्तीचे सामर्थ्य प्रचंड आहे. मराठीवर सरकारने केलेल्या अन्यायाची चीड आता संतापात संचारली तर सरकारही उलथून टाकण्यास त्या मागे-पुढे पाहणार नाहीत. कधी शांतादुर्गा, तर कधी महाकाली बनून असुरांचा संहार करण्यास त्या कचरणार नाहीत याची जाणीव आम्हाला आहे. विद्यमान सरकारमध्ये मराठी राजभाषा व्हावी या मताचे अनेक आमदार असताना जर निवडणुकीपूर्वी मराठी राजभाषा करण्याचा निर्णय घेतला नाही तर सरकार उलथून टाकू, असा इशारा प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी दिला आहे.
राजभाषा निर्धार समिती म्हापसा प्रखंडच्या वतीने शनिवारी हळदोणा मतदारसंघातील नास्नोडा पंचायतीच्या सभागृहात मातृशक्ती मेळावा आयोजित करण्यात आला होता. मराठी राजभाषा निर्धार समिती म्हापसा प्रखंडच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.
कार्यक्रमाला मातृशक्ती प्रमुख अॅड. रोशन सामंत, अतुला बेळेकर, सरपंच रिया मयेकर, पंच सदस्य गोविंद गोवेकर तसेच नीता रायकर उपस्थित होत्या. वेलिंगकर यांनी आपल्या भाषणात मराठीवर सरकार करीत असलेल्या अन्यायावर, सापत्न वागणुकीवर कडाडून टीका केली. माजी मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी संस्कृती संवर्धनासाठी मराठी शाळा खेड्यातून सुरू केल्या. पण, त्याच सरकारी शाळा आता ओस पडू लागल्या आहेत.
नव्या मराठी शाळांना आत परवानगी दिली जात नाही. शाळांना दिले जाणारे २ अनुदानही सरकारने बंद केले आहे. आम्ही सर्व आमदारांना भेटून निवेदने देऊन मराठीवर होणाऱ्या अन्यायाची माहिती दिली. तसेच भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याची विनंती केली. सर्व आमदारांची मते सकारात्मक असताना सरकार मराठीवरील अन्याय दूर करण्यास तयार नसल्याचे वेलिंगकर म्हणाले.
गणपती मंदिर ते सभागृहापर्यंत आलेल्या दिंडी पथकाने मेळाव्याची सुरुवात झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून संत ज्ञानेश्वर आणि जिजाबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
राष्ट्रपतींना पाच लाख सह्यांचे निवेदन
अॅड. रोशन सामंत यांनी स्वागतपर भाषणात समितीच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच पाच लाख सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना सादर करण्यात येणार असल्याची माहिती दिली. अतुला बेळेकर यांनी प्रतिज्ञा वाचन केले. सूत्रसंचालन शशिकला काळे यांनी केले. यावेळी १५ महिला पथकांचा सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर पसायदानातून मेळाव्याची सांगता झाली.
Web Summary : Subhash Velingkar warned the government could be overthrown if it doesn't make Marathi an official language before elections. He criticized the government's neglect of Marathi, highlighting closed schools and stopped grants, during a meeting organized by the Rajbhasha Nirdhar Samiti.
Web Summary : सुभाष वेलिंगकर ने चेतावनी दी कि अगर सरकार चुनावों से पहले मराठी को आधिकारिक भाषा नहीं बनाती है तो उसे गिरा दिया जाएगा। उन्होंने राजभाषा निर्धार समिति द्वारा आयोजित बैठक में मराठी की सरकारी उपेक्षा की आलोचना की, जिसमें बंद स्कूलों और अनुदानों को रोकने पर प्रकाश डाला।