लोकमत न्यूज नेटवर्क, मोपा : दोडामार्ग तालुक्यात धुडगूस घालून काल दिवसभर मोपा येथे स्थिरावलेला ओंकार हत्ती रात्री दहाच्या सुमारास महाराष्ट्र सीमेवरील कडशी मोपा, दाड या मोपा विमानतळापासून अवघ्या काही अंतरावर स्थिरावला होता. काल दिवसभर पराकोटीचे प्रयत्न करून वनखात्याच्या कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी हत्तीला कडशीमोपा, खोलबाग, हाळी, चांदेल भागातून नेतर्डे भागातील जंगलात पोहचवण्यात यश मिळवले.
हत्तीच्या बंदोबस्तासाठी वनखात्याचे मुख्य वनसंरक्षक नवीनकुमार, उप वनसंरक्षक जीस वर्की, परिक्षेत्र वनाधिकारी सॅबेस्ताव रॉड्रिग्स, पेडणेचे वनाधिकारी हरीष महाले, फोंडा तसेच पेडणे वन खात्याचे कर्मचारी सक्रिय होते. काल सायंकाळपासून मोपा, करमळी, वेताळ मंदिर पेडुळ, भाटले, दाड असा प्रवास करत हत्तीने कडशी-मोपा गाठले होते. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांना सतर्क केले.
विमानतळ परिसरातही वावर
रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हत्ती मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात असलेल्या जंगलात पोहोचला. मात्र तेथील वर्दळ, गजबज व विजेचे प्रखर दिवे यामुळे पुन्हा तो माघारी फिरला. सकाळी सात वाजेपर्यंत त्याचा वावर मोपा, कडशी व चांदेल परिसरात होता. गोवावनविभागाच्या पथकाने फटाके फोडून त्याला पुन्हा महाराष्ट्राच्या हद्दीत पाठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो गेला नव्हता. गावठाणवाडा मोपा येथील जंगलात त्याचे वास्तव्य होते.
सिंधुदुर्ग विरुद्ध गोवा वाद
दरम्यान, हत्तीने सिंधुदुर्ग हद्दीत प्रवेश केल्यानतंर सिंधुदुर्ग वनविभागाचे जलद कृती दलाचे पथक सीमेवर ठाण मांडून होते. तर गोव्याचे वनाधिकारी व नागरिक त्याला महाराष्ट्रातील हद्दीत सोडण्यासाठी प्रयत्न करत होते. ज्या ठिकाणी महाराष्ट्राचे वनाधिकारी गस्त घालत आहेत, त्याचा अंदाज घेऊन गोव्यातील वनाधिकाऱ्यांनी दुसऱ्या बाजूने हत्तीला नेण्याचा प्रयत्न केला. या दोन राज्यांच्या सीमावादात हत्तीची कुचंबणा झाली. यातून हत्ती अधिकच सैरभैर झाला. आणि आक्रमक बनला आहे. रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांनी विनाकारण घराबाहेर न पडता घरातच थांबावे अशा सूचना वनविभागाने दिल्या आहेत.