सुहास बेळेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'जनमत कौल' ज्या दिवशी झाला, तो १६ जानेवारी हा दिवस 'सरकारी कार्यक्रम' म्हणून साजरा करण्याचे सरकारने ठरवले आहे. १६ जानेवारी १९६७ रोजी गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे की गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व ठेवावे यासाठी जनमत कौल घेण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर सरकारने पहिली पंचायत निवडणूक झालेला २४ ऑक्टोबर व ९ डिसेंबर हा पहिल्या विधानसभा निवडणुकीचा दिवसही सरकारी पातळीवर साजरा करण्याची गरज आहे.
पूर्वी 'जनमत कौल' हा दिवस सरकारी पातळीवरून साजरा केला जात नव्हता. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना आणि विजय सरदेसाई त्यांच्या मंत्रिमंडळात असताना एक/दोन वर्षे तो सरकारी पातळीवरून साजरा केला गेला होता; पण त्यानंतर तो केला जात नव्हता. आता पुन्हा सरकारने तो अधिकृतरीत्या साजरा करायचे ठरवले आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी जुलै २०२४ मध्ये जनमत कौल साजरा करण्यासंदर्भात एक खासगी ठराव मांडला होता.
त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनमत कौल दिन सरकारी पातळीवर साजरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे सरकारने आता हा निर्णय घेतला आहे. तशी अधिसूचनाही काढली आहे; पण आणखी दोन दिवस असे आहेत, जे सरकारने साजरे केले पाहिजेत. तेही अत्यंत महत्त्वाचे आहेत.
गोवा पंचायत राज दिन...
पहिला दिवस म्हणजे २४ ऑक्टोबर १९६२. या दिवशी स्वतंत्र गोव्यात पहिली पंचायत निवडणूक घेतली गेली होती. पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाल्यानंतर गोव्यात पहिल्यांदाच अशी निवडणूक होत होती. या निवडणुकीने गावचा कारभार गावच्या लोकांनीच पाहण्यासाठी आपले प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार लोकांना मिळाला होता, असे पहिल्यांदाच घडले.
यापूर्वी गोमंतकीयांना मतदानाचा अधिकार नव्हता. लोक मत द्यायला किती उत्सुक होते आणि त्याच वेळी मतदान प्रक्रियेशी किती अनभिज्ञ होते, हेही लोकांनी बघितले होते. त्यामुळे गोव्याच्या राजकीय इतिहासात हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे तो सरकारी पातळीवरून साजरा होणे आवश्यक आहे. २४ ऑक्टोबर हा दिवस सरकारला 'गोवा पंचायत राज दिन' म्हणून साजरा करता येईल.
लोकशाही दिन....
दुसरा महत्त्वाचा दिवस आहे, तो ९ डिसेंबर १९६३. या दिवशी मुक्त गोव्याचे पहिले लोकनियुक्त सरकार निवडण्यासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीने प्रथमच आपले सरकार आपण निवडण्याचा अधिकार लोकांना मिळाला. या निवडणुकीनंतरच गोव्यात पहिले लोकनियुक्त सरकार सत्तेवर आले होते. या निवडणुकीने गोव्याला देशातील इतर प्रदेशांबरोबर आणले.
देशातील लोकशाहीच्या प्रवाहात गोवा सामील २ झाला. त्यामुळे हाही दिवस महत्त्वाचा आहे. सरकारने तो साजरा करावा. या दिवसाने गोव्यात लोकशाही आली. त्यामुळे हा दिवस 'लोकशाही दिन' म्हणून साजरा करावा. या दोन्ही ऐतिहासिक दिनांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत जायचा असेल तर हे दोन्ही दिवस सरकारने साजरे केले पाहिजेत.