पणजी : नव्या जुवारी पुलाची पायाभरणी येत्या डिसेंबर किंवा जानेवारीत होईल, अशी घोषणा बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी गुरुवारी विधानसभेत केली. या पुलासाठी केंद्र सरकारने १ हजार कोटी मंजूर केले असून आॅगस्ट अखेरपर्यंत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बांधकाम खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. २६ जानेवारी रोजी पायाभरणी करण्याचे नियोजन आहे; परंतु अजून तारीख निश्चित केली नसल्याचे ढवळीकर म्हणाले. पाणीगळती रोखा! विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर लक्ष वेधताना ४० टक्के पाणी वाया जात असल्याची टीका केली. जलकुंभ जुने झाले आहेत, असे ते म्हणाले. आमदार दिगंबर कामत म्हणाले की, किमान ९० दिवसांत तरी कामांच्या वर्क आर्डर दिल्या पाहिजेत. त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करायला हवीत. मडगावची अनेक बांधकामे वर्क आॅर्डरअभावी रखडली आहेत. कंत्राटदारांची बिले पडून आहेत. मडगावचा रिंग रोड पूर्णत्वास आला आहे. कोलवा सर्कलजवळ काही घरे विस्थापित करावी लागत आहे. त्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा. (प्रतिनिधी)
नव्या जुवारी पुलाची
By admin | Updated: August 1, 2014 01:48 IST