लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : किटल, केपे येथील पारुल विद्यापीठाच्या कॅम्पसचे उद्घाटन गुरुवारी झाले. कला अकादमी संकुलात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. 'राज्यातील हे पहिले खासगी विद्यापीठ असून, गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणात नवे पर्व सुरू झाले आहे,' असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'पारुल विद्यापीठ गोव्यात उच्च शिक्षणात नवीन युगाची सुरुवात करत आहे. जर खासगी विद्यापीठ आले नसते, तर विद्यार्थ्यांना गोव्याबाहेर जावे लागले असते. खासगी विद्यापीठांचा विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि गोव्याची अर्थव्यवस्थाही पुनरुज्जीवित होईल.'
आणखी दोन खासगी विद्यापीठे
मुख्यमंत्र्यांनी असे स्पष्ट केले की, 'पारुल'सह आणखी दोन खासगी विद्यापीठांना सरकारने मान्यता दिली आहे. याव्यतिरिक्त आणखी खासगी विद्यापीठांना परवानगी देण्याचा तूर्त विचार नाही. नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करणारी विदेशी विद्यापीठे येत असतील तर त्याबद्दल विचार करू.'
किटल-केपेंत इमारत
किटल, केपे येथे ५६,४८० चौरस मीटर क्षेत्रफळावर इमारत बांधकाम होणार आहे. त्याचा काही भाग पूर्ण झाला आहे व चालू शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांचे अॅडमिशनही झाले आहे. एकूण ९६,३२७ चौरस मीटर जमिनीत हा कॅम्पस आहे. 'पारुल'मध्ये ७५ टक्के गोमंतकीय विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ७० टक्के कर्मचारी गोमंतकीय आहेत. या विद्यापीठाने गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी सुमारे एक कोटी रुपयांची शिष्यवृत्ती दिली आहे.