लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: इयत्ता सहावी ते दहावी व बारावीसाठी नवे शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होणार आहे. एप्रिलमध्ये सकाळी ११.३० वाजेपर्यंत वर्ग चालतील. १ मे ते ३ जून उन्हाळी सुट्टी असेल, असे शिक्षण खात्याकडून जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
सर्व सरकारी, अनुदानित तसेच विना अनुदानित शाळांसाठी हे परिपत्रक लागू असल्याचे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी स्पष्ट केले आहे. एप्रिलमध्ये गोव्यात कडक उन्हाळा असतो, त्यामुळे वर्ग सकाळी ८ ते ११.३० वाजेपर्यंतच चालतील. १ मे ते ३ जून अशा उन्हाळी सुट्टीनंतर ४ जूनपासून सर्व इयत्तांचे वर्ग नेहमीच्या वेळेतच सुरू होतील. शाळा व्यवस्थापनांनी परिपत्रक सूचना फलकावर लावावे. तसेच सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांना याची माहिती द्यावी. पहिल्या टप्प्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठीच हा नवा बदल लागू केल्याचे पत्रकात म्हटले आहे.
'अपार' नाही तर लाभ नाही
यापुढे शाळा बदलताना किंवा अन्य राज्यात शाळेत प्रवेश घेताना अपार आयडी क्रमांकाचा उल्लेख करणे विद्यार्थ्यांना बंधनकारक राहील, असे आणखी एक परिपत्रक शिक्षण खात्याने काढले आहे. मोफत पाठ्यपुस्तके, माध्यान्ह आहार तसेच सरकारच्या इतर सवलती मिळवण्यासाठीही अपार आयडी अनिवार्य असल्याचे परिपत्रकात म्हटले असून या अनुषंगाने शाळा व्यवस्थापनांनी विनाविलंब विद्यार्थ्यांना अपार आयडी क्रमांक देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश दिले आहेत.
पाचवीचा वर्ग जूनमध्येच
या निर्णयामुळे गोवा शालान्त मंडळ केंद्रीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या तत्त्वावर कार्यरत राहणार आहे. या निर्णयामुळे मे महिन्यात दिल्या जाणाऱ्या सुट्टीवरही काहीच परिणाम होणार नाही. मे महिना हा सुट्टीचाच असेल. परंतु एप्रिल महिन्यातच मुलांना पुढच्या वर्गाचा अभ्यासक्रम शिकविण्यास सुरूवात होणार आहे. सध्या तरी प्राथमिक इयत्तेचे वर्ग एप्रिलमध्ये सुरू न करता जूनमध्येच ते सुरू करण्याचे धोरण कायम ठेवले आहे, अशी माहिती शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी दिली. यापूर्वी शैक्षणिक वर्ष ४ जूनमध्ये सुरू व्हायचे. यामुळे अंतिम परीक्षा झाली की विद्यार्थ्यांना एप्रिलनंतर सुट्टीच असायची. यामुळे महिन्यापेक्षा अधिक दिवस सुट्टी मिळायची. आता ही प्रथा बंद होणार आहे.
'आयटीआय'च्या विद्यार्थ्यांना दहावी, बारावीचा दर्जा : मुख्यमंत्री
ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवी उत्तीर्ण करून आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्यांना १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या दर्जा दिला जाईल. दहावीनंतर २ वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या समकक्ष मानले जाईल. याबाबतचे परिपत्रक जारी केले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. कौशल्य विकास संचालनालयातर्फे डिचोली, फर्मागुडी, वास्को, काकोडा आणि म्हापसा येथे टाटा टेक्नॉलॉजी अंतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्स प्रकल्पाच्या ऑनलाईन पायाभरणी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, गौरीश धोंड व खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील आयटीआय अभ्यासक्रमात अनेक बदल झाले आहेत. यात टाटा ग्रुपकडून मोठे सहकार्य लाभले आहे. २०० कोटी खर्चापैकी १६८ कोटी खर्च हा टाटा ग्रुपचा आहे. त्यामुळे भविष्यात आयटीआयचा दर्जा आणखी वाढणार आहे. आयटीआयबरोबर अनेक कंपन्यांनी करार केला असून अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
बारावीचा दर्जा मिळालेले विद्यार्थी पुढे बीए, बीकॉम किंवा विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ शकतात. या वर्षापासून हे परिपत्रक काढले जाणार आहे. त्यामुळे आयटीआयचा विद्यार्थी आता कुठल्याच क्षेत्रात मागे राहणार नाही. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
शैक्षणिक वर्षासंबंधी करण्यात आलेल्या बदलांसंदर्भात आणि त्याच्या अंमलबजावणीची माहिती देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील शिक्षकांबरोबर विशेषतः मुख्याध्यापकांशी शिक्षण खात्याकडून संवाद साधला जाईल. - प्रसाद लोलयेकर, शिक्षण सचिव