लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : शिरोडा येथील कामाक्षी संस्थेचा वार्षिक नवरात्रोत्सव सोमवार, दि. २२ सप्टेंबर ते बुधवार, दि. ८ ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानुसार साजरा होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष राजन कामत बुडकुले, अटर्नी राजन पै फोंडेकर, खजिनदार सचिन पै बीर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत कार्यक्रम जाहीर केला.
सोमवारी (दि. २२) सकाळी घटस्थापना होईल. सायंकाळी सात वाजता शेखर बुवा व्यास यांचे कीर्तन होईल. गुरुवारी (दि. २ ऑक्टोबर) विजयादशमी साजरी होणार आहे, तर रात्री सात वाजता रायेश्वर रौप्य अश्वारूढ (सीमोल्लंघन) होईल. शुक्रवारी (दि. ३) दुपारी ३ वाजता कामाक्षी व शांतादुर्गा देवींच्या तरंगांचे मंडपात आगमन होईल. रात्री आठ वाजता श्री कामाक्षी देवळात कौल आरंभ होणार आहे.
संपूर्ण नवरात्रौत्सवादरम्यान सकाळी लक्ष्मीनारायण, ग्रामपुरुष, रायरेश्वर, शांतादुर्गा व घटस्थापना आरती, पुराण वाचन होणार आहे. संध्याकाळी मखरोत्सव, आरती, प्रार्थना व तीर्थप्रसाद होईल. बुधवारी (दि. १) महोत्सवाची सांगता होणार आहे.