पणजी : श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी आपल्याला गोव्यात येण्यास परवानगी मागणाऱ्या अर्जावर पणजी जिल्हाधिकाऱ्यांकडून मंगळवार दि. २७ रोजी निवाडा सुनावण्यात येणार आहे. गोव्यात आपल्याला देवदर्शनासाठी यायचे आहे, असे कारण त्यांनी दिलेले आहे. श्रीराम सेनेचे प्रमुख मुतालिक यांना गोव्यात प्रवेशबंदी केल्यानंतर त्यांनी गोव्यात येण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर परवानगी मागितली होती. त्यांच्या अर्जावर शनिवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांपुढे सुनावणीही झाली. मुतालिक यांच्या वकिलांनी मुतालिक यांची बाजू मांडताना त्यांना गोव्यात येण्यास मज्जाव करण्याचा निर्णय हा असंवैधानिक असल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांना काही कारणांसाठी गोव्यात येण्यास मुभा द्यावी, अशी जी मागणी केली होती ती कोणत्या कारणांसाठी आहे हे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. मुतालिक यांची बाजू मांडताना त्यांचे वकील नागेश ताकभाते यांनी सांगितले की, मुतालिक यांना गोव्यात देवदर्शनासाठी यायचे आहे. फोंड्यात मंगेशी आणि इतर देवस्थानांत जाऊन वर्षातून एकदा ते देवदर्शन घेत असतात. घटनेने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिलेले असून तो हक्क हिरावून घेणे असंवैधानिक ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अॅड. ताकभाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली.मुतालिक हे त्यांच्या श्रीराम सेनेमुळे वादग्रस्त ठरले होते. श्रीराम सेनेची शाखा गोव्यात सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यामुळे गोव्यात येण्यास त्यांना कायद्याने मज्जाव करण्यात आला आहे. त्यांच्यावर घालण्यात आलेली बंदी सलग तीन वेळा वाढविली आहे. मध्यंतरी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मुतालिकांच्या भाजप प्रवेशास हरकत घेतल्याने त्यांचे पक्ष सदस्यत्व रद्द केले होते. (प्रतिनिधी)
मुतालिकना गोव्यात देवदर्शनासाठी यायचे आहे!
By admin | Updated: January 25, 2015 01:42 IST