पणजी : वीज खात्याची मान्सूनपूर्व कामे ‘फ्लॉप शो’ ठरली आहेत. पावसाच्या पहिल्याच दणक्यात इन्सुलेटर्स फुटले, कंडक्टर्स निकामी झाले तसेच फीडरही बिघडले. कुर्टी व थिवी येथून येणार्या वीज वाहिन्यांतही बिघाड झाल्याने फोंडा, तिसवाडी, बार्देस तालुक्यांमध्ये लोकांचे अक्षरश: हाल झाले. उष्म्याने लोक हैराण झाले. शिवाय व्यावसायिकांनाही जबर फटका बसला. विजेतील व्यत्ययाचा फटका फोंडा व परिसरातील लोकांना जास्त बसला आहे. पर्वरीतही सलग दोन रात्री वीज खंडित झाल्याने लोकांचे हाल झाले. राजधानी शहरातही दोन दिवस लपंडाव चालू होता. कुर्टी-फोंडा येथील संध्या केटरर्सच्या मालक संध्या वझे यांनी विजेचा खेळखंडोबा चालल्याने तीव्र संताप वक्त केला. लोकांच्या लग्नाच्या जेवणाच्या आॅर्डर्स असतात. अचानक वीज गायब होते व तीन-तीन तास येत नाही. त्यामुळे स्वयंपाकाचे काम अडते. या व्यवसायात आॅर्डर वेळेवर पोचविणे महत्त्वाचे असते. वीज खंडित झाल्यास त्रास होतो. कोपरवाडा-फोंडा येथील श्रद्धा भातखंडे म्हणाली की, विजेचा दाब कमी जास्त होत असल्याने घरातील विद्युत उपकरणे निकामी होतात. फ्रीजमधील पदार्थ नासले. वीज नाही म्हणून पाणी नाही, अशीही स्थिती ओढवली. मरड-धारबांदोडा येथील सदानंद गावडे म्हणाले की, वीज नसल्याने नळाचे पाणी येत नाहीच. पंप बंद असल्यामुळे विहिरीचे पाणीही मिळत नाही. कोल्ड्रिंक्स हाउस, हॉटेल्स यांनाही खंडित विजेमुळे मोठा फटका बसला आहे. दरम्यान, वीज खात्याचे येथील अभियंता पाटील यांना विचारले असता, सोमवारच्या गडगडाटावेळी निकामी झालेल्या कुर्टी व थिवी येथील वीजवाहिन्या दुरुस्त केलेल्या असून सर्वत्र सुरळीत पुरवठा होत असल्याचा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)
वीज खात्याची मान्सूनपूर्व कामे ‘फ्लॉप
By admin | Updated: May 22, 2014 18:25 IST