लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मिराबाग येथील बंधाऱ्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद काल, शुक्रवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत उमटले. प्रश्नोत्तराचा तास सुरू असतानाच चार आंदोलकांनी प्रेक्षक गॅलरीत उभे राहून घोषणाबाजी केली आणि फलक फडकावले, ज्यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे विधानसभेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
आमदार विजय सरदेसाई यांनी मिराबाग आंदोलनाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. ते बोलत असतानाच प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या चार आंदोलकांनी अचानक उभे राहून बंधाऱ्याविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. आंदोलकांनी आपल्या हातातील फलक उंचावून सरकारचा निषेध केला.
या अनपेक्षित प्रकारामुळे सभागृहाचे कामकाज काही वेळ विस्कळीत झाले. मार्शलनी तातडीने या चारही आंदोलकांना ताब्यात घेतले आणि त्यांना विधानसभेच्या गॅलरीतून बाहेर काढले. जलस्रोतमंत्री शिरोडकर यांनी सरकारची बाजू मांडली.
मिराबाग बंधारा हा लोकहितासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. साळावली धरणासाठी अनेक लोकांनी आपल्या जमिनी आणि घरांचे बलिदान दिले, म्हणूनच आज दक्षिण गोवा आणि मुरगावमधील जनतेला पाणी मिळत आहे, याची आठवण त्यांनी करून दिली. मिराबाग बंधाऱ्यामुळे कोणाचेही घर पाडले जाणार नाही, ही वस्तूस्थिती असल्याचे स्पष्ट केले.
या घटनेवर वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आपल्या गेल्या २७ वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत असा प्रकार कधीही घडला नसल्याचे त्यांनी सांगितले. आज हे लोक फलक घेऊन सभागृहात शिरले आहेत, उद्या ते दगड घेऊन येतील आणि सभापती किंवा मंत्र्यांवर हल्ला करतील, अशी भीती व्यक्त करत त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली.
त्यांना अटक करा: मुख्यमंत्री
अधिवेशन सुरू असताना असे असभ्य व बेकायदेशीर प्रकार करणाऱ्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभापतींकडे केली. विधानसभेची प्रतिमा मलीन करून विरोधकांनी असे घाणेरडे राजकारण करू नये, असेही ते म्हणाले.
प्रतिबंधात्मक कारवाई
विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत फलक झळकावल्याप्रकरणी सभापती गणेश गावकर यांच्या तक्रारीवरून पर्वरी पोलिसांनी चौघांना अटक केली. आपा नाईक, उपेंद्र नाईक, उमेश नाईक आणि हेमंत भंडारी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. शुक्रवारी सभागृहाचे कामकाज सुरू असताना चौघांनी अचानक फलक झळकावून घोषणाबाजी केली. या कृत्यामुळे सभागृहाच्या शिस्तीचा भंग झाल्याचा ठपका ठेवत सभापतींनी त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले. या अटकेनंतर मिराबाग परिसरात संतापाचे वातावरण असून, जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
Web Summary : Mirabag dam protest echoes in Goa Assembly; four arrested for disrupting proceedings. Protesters raised slogans, displayed placards against the dam. Chief Minister demands arrests for the disruption. Villagers vow to continue protests until the project is canceled.
Web Summary : मिराबाग बांध का विरोध गोवा विधानसभा में गूंजा; कार्यवाही बाधित करने पर चार गिरफ्तार। प्रदर्शनकारियों ने बांध के खिलाफ नारे लगाए, पोस्टर दिखाए। मुख्यमंत्री ने व्यवधान के लिए गिरफ्तारी की मांग की। ग्रामीणों ने परियोजना रद्द होने तक विरोध जारी रखने का संकल्प लिया।