लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : अगोदर सर्व मंत्री हे सचिवालयात लोकांसाठी उपलब्ध असायचे. आता सहसा ते कोणाला भेटत नाहीत. या शिवाय तालुक्याच्या मुख्यालयातही मंत्र्याने लोकांसाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, तिथेही ते उपस्थित नसतात, अशी खंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी काल व्यक्त केली.
तानावडे म्हणाले की, दक्षिणेची जागा जिंकण्यासाठी पक्षाने खूप काम केले. परंतु जिंकू शकलो नाही, याचे एक कारण म्हणजे भाजप कार्यकर्ते व नेते काही प्रमाणात गाफील राहिले. अतिआत्मविश्वासामुळे दक्षिणेची जागा हातातून गेली. भाजपला ४०० पार बहुमत मिळाल्यास भाजप संविधान बदलणार असा विरोधकांनी अपप्रचार केला त्याचाही परिणाम झाला, असेही तानावडे म्हणाले.
अध्यक्ष म्हणून नवीन चेहरा हवा
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यावर प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. आता पक्षाला अध्यक्ष म्हणून नवीन चेहरा मिळाला तर अधिक बरे होईल, असेही ते म्हणाले.