पणजी : ग्रामीण विकास खात्याचे मंत्री मिकी पाशेको तुरुंगात जातील, यावर बुधवारी तत्त्वत: शिक्कामोर्तब झाले. त्यांच्यासाठी सगळे मार्ग बंद झाले आहेत. त्यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना तुरुंगात पाठवावे, असे शासकीय पातळीवर ठरले असल्याची माहिती मिळाली आहे.वीज अभियंता मारहाणप्रकरणी दोषी ठरलेले व शिक्षा झालेले पाशेको अजूनही दिल्लीत आहेत. वकिलांशी चर्चा करून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी फेरविचार याचिका सादर केली आहे. गुरुवारी (दि.२) ते गोव्यात परततील व मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भेट घेतील, असे सूत्रांनी सांगितले.पाशेको यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन पोलिसांच्या स्वाधीन होणे एवढाच मार्ग त्यांच्यासमोर राहिला आहे. सामाजिक कार्यकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिग्स यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत बुधवारी राज्यपाल मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव व पोलीस प्रमुखांना सादर केली. त्यामुळे आपल्याला न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळालेली नाही, असे आता सरकार म्हणू शकणार नाही.दरम्यान, पाशेको यांना सहा महिने तुरुंगात राहावे लागणार आहे. सडा-वास्को येथील तुरुंगात त्यांची रवानगी केली जाऊ शकते, अशी माहिती शासकीय पातळीवरून मिळाली. पाशेको यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नाही, तर सरकारची आणखी नाचक्की होईल, याची कल्पना सरकारला आली आहे. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी तर पाशेको यांना पायउतार व्हावे, अशी स्पष्ट सूचना करण्याचे ठरविले आहे, असे सूत्रांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)
मिकी तुरुंगातच
By admin | Updated: April 2, 2015 02:09 IST