डिचोली : कर्नाटक निरावरी निगमने कणकुंबी येथे आयोजित केलेली कणकुंबी ग्रामस्थ व माउली देवस्थान प्रतिष्ठान यांची संयुक्त बैठक अचानक रद्द केल्यने माउली मंदिर प्रतिष्ठान व नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कर्नाटक सरकार हेतुपुरस्सर माउली देवस्थान आणि परिसराला संकटाच्या खाईत लोटून कणकुंबीवासियांना वेठीस धरत आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी माउली प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बबन दळवी, सामाजिक कार्यकर्ते किरण गावडे यांनी अधिकार्यांची भेट घेऊन माउली मंदिराच्या दुरुस्तीबाबत बैठक घेण्याचे ठरले होते. ११ रोजी कर्नाटक निरावरी निगमचे रुद्रय्या हे बैठकीला यायचे होते. त्यासाठी सर्व मंडळी जमली होती. मात्र, अचानक प्रा. दळवी यांना ही बैठक रद्द करण्यात आल्याचा संदेश आल्याने उपस्थितांनी कर्नाटकाच्या भूमिकेबाबत तीव्र संताप व्यक्त केला. दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकाने कळसाचे काम सुरू करताना मंदिराला कसलाच धोका पोचणार नसून कालवे भुयारी असतील, असे सांगितले होते; परंतु १२ वर्षांनी तीर्थ येणारे पवित्र तळे, मलप्रभा नदीचा परिसर आणि माउलीचा सभामंडप आदी कळसाच्या कामामुळे उद््ध्वस्त झाल्याचे सांगितले. किरण गावडे यांनी कर्नाटक सरकार सीमावासियांची थट्टा करत असून त्यांच्या अलोकशाही कृतीमुळे कणकुंबीवासियांवर मोठी आपत्ती कोसळली असून एकूणच बेदरकार कामाबद्दल संताप व्यक्त केला. दरम्यान, कर्नाटक निरावरी निगमचे व्यवस्थापकीय संचालक रुद्रय्या यांच्याशी संपर्क साधला असता सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलसिंचन मंत्रालयाला कळसा कालव्याच्या कामाचा अहवाल सादर करण्याची जबाबदारी असल्याने ही बैठक रद्द केल्याचे सांगून पुढील तीन दिवसांत कणकुंबीला भेट देऊन बैठकीत चर्चा करणार असल्याचे सांगितले. कंत्राटदार अनिल कुमार यांनी देवस्थान प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या आग्रहाखातर मंदिराची दुरुस्ती करून देणार असल्याचे लेखी पत्र सादर केले आहे. (प्रतिनिधी)
कणकुंबी येथील बैठक रद्द
By admin | Updated: May 12, 2014 01:26 IST