लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गालजीबाग-काणकोण येथे सागरी उद्यान (मरिन कंझर्वेशन पार्क) उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती वनमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीत बोंडला अभयारण्य तसेच अन्य विषयांवरही चर्चा झाली. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. मी माझ्या काही सूचना मांडल्या, असे राणे यांनी सांगितले.
प्रस्तावित मरिन कंझर्वेशन पार्कमध्ये सागरी वन्यजीव आणि परिसंस्थांचे संवर्धन केले जाईल. जैव विविधता संवर्धनाबरोबरच इको-टुरिझमसाठी संधीही उपलब्ध होईल. पर्यावरणीय संतुलन राखून ठवण्याच्या बाबतीतही या पार्कचा फायदा होईल. सुव्यवस्थित सागरी उद्याने मनोरंजन आणि पर्यावरणीय पर्यटनाला समर्थन देऊ शकतात.
'चरावणे' बाबत बैठक घेणार
सत्तरी तालुक्यातील चरावणे येथील प्रस्तावित जलाशयाच्या माध्यमातून ठाणे व परिसरातील शेतकऱ्यांना २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करू, असे विश्वजित राणे यांनी सांगितले. ते म्हणाले की, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्यासोबत मी व पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी एक बैठक घेतलेली असून पुढील आठवड्यात आणखी एक बैठक होणार आहे. चरावणेचा प्रस्तावित जलाशय फार मोठा असल्याने परिसरात लोकांना २४ तास पाणीपुरवठा करण्याची क्षमता असेल. प्रतापसिंग राणे यांनी मुख्यमंत्री असताना 'चरावणे'साठी २० कोटी मंजूर केले होते.