लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : सौरऊर्जा ही काळाची गरज असून, तिच्या माध्यमातून गोवा ऊर्जा-स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे. नागरिकांनी स्वहित आणि देशहित लक्षात घेऊन सौरऊर्जा प्रणाली बसविण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी आणि ग्रामीण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने 'हर घर उद्यान, हर गोवन समृद्ध', तसेच पीएम सूर्य घर योजना जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिर येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर, कला मंदिराचे अध्यक्ष व नगरसेवक रितेश नाईक, नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, कुर्टीचे सरपंच नावेद तहसीलदार, जिल्हा पंचायत सदस्य प्रीतेश गावकर, गौरी शिरोडकर, पूनम सामंत, गणपत नाईक, कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई, ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक प्रेमराज शिरोडकर, नवीकरणीय ऊर्जा खात्याचे संचालक सोहन उस्कैकर, गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचे व्यवस्थापकीय संचालक गौरीश पिळगावकर, तसेच गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष पांडुरंग कुट्टीकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, सौरऊर्जा प्रणाली बसविल्यानंतर सुरुवातीची पाच वर्षे कंत्राटदारामार्फत देखभाल केली जाते. मात्र, भविष्यात संपूर्ण ३० वर्षाची देखभाल व्यवस्था शासनाच्या वतीने करण्याचा मानस आहे. या योजनेत केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान उपलब्ध असून, साधारण दोन वर्षांत गुंतवणूक वसूल होते. त्यानंतर, दीर्घकालीन लाभ मिळतो. 'गोव्यात वीज निर्मिती होत नसल्याने आपण विजेच्या बाबतीत परावलंबी आहोत. सौरऊर्जेचा व्यापक अवलंब केल्यास राज्य ऊर्जा-स्वयंपूर्ण होऊ शकते," असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सोहन उसकईकर यांनी सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले.
राज्यातील ५० हजार महिला स्वयं-साहाय्य गटांद्वारे संघटित झाल्या असून, मागील ११ वर्षात तब्बल ३४० कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला आहे. आगामी काळात १ लाख महिलांना या चळवळीत सहभागी करून किमान ५०० कोटी रुपयांचा व्यवहार साध्य करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'लखपती दीदी' उपक्रमाचा उल्लेख करत त्यांनी कृषीपासून आधुनिक व्यावसायिक क्षेत्रापर्यंत महिलांनी संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सौर ऊर्जा योजनेमुळे 'शून्य वीजबिल' ही संकल्पना शक्य असल्याचे सांगितले. गोव्याचे हवामान सौरऊर्जेसाठी अनुकूल असून, अतिरिक्त निर्मित वीज सरकार खरेदी करेल, त्यामुळे नागरिकांना उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध होईल, असे त्यांनी नमूद केले.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सौर ऊर्जा ही स्वावलंबनाची चळवळ असल्याचे सांगून हरित विकासासाठी सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
सौरऊर्जा प्रसार आणि महिला सक्षमीकरण या दुहेरी ध्येयातून 'विकसित गोवा २०३७' आणि देशाच्या २०४७ च्या संकल्पपूर्तीकडे राज्याची वाटचाल सुरू असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
४१ वाहने सुपुर्द
कार्यक्रमात ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून ४१ महिला लाभार्थ्यांना शून्य टक्के व्याजदराने वाहने सुपुर्द करण्यात आली, तसेच क्लस्टर लेव्हल फेडरेशनअंतर्गत १८ स्वयं-साहाय्य गटांना एकूण ६६ कोटी रुपयांचा निधी धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आला. महिलांना उद्योगशील बनविणे आणि त्यांना स्वावलंबी करण्यासाठी हा निधी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
Web Summary : Goa aims for energy self-sufficiency via solar power. CM Sawant urged citizens to adopt solar energy, highlighting government support and long-term benefits. Women's empowerment is also a focus, with financial assistance provided to self-help groups.
Web Summary : गोवा का लक्ष्य सौर ऊर्जा से ऊर्जा आत्मनिर्भरता है। मुख्यमंत्री सावंत ने नागरिकों से सौर ऊर्जा अपनाने का आग्रह किया, सरकारी समर्थन और दीर्घकालिक लाभों पर प्रकाश डाला। महिला सशक्तिकरण पर भी ध्यान केंद्रित किया गया है, स्वयं सहायता समूहों को वित्तीय सहायता प्रदान की गई है।