लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सनबर्नच्याबाबतीत पंचायतीने आधी आमच्याकडे येऊ द्या, आपली भूमिका स्पष्ट करू द्या. त्यानंतरच मी या विषयावर बोलेन, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले. एका कार्यक्रमासाठी ते उपस्थित असता पत्रकारांनी त्यांना धारगळ येथे सनबर्नच्या आयोजनास जो विरोध होत आहे व त्यामुळे वातावरण तापलेले आहे, त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, पंचायतीने आधी भूमिका स्पष्ट करु दे.
धारगळ येथे सनबर्न आयोजित करण्यास स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनी जोरदार विरोध केला आहे. हा ईडीएम उधळून लावण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. गोव्यात पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी सरकार सकारात्मकदृष्ट्या प्रयत्न करीत आहे. पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायला हवे. मग ते सरकार असो, उद्योग किंवा प्रसार माध्यमे असोत, सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत, असे खंवटे म्हणाले.
दरम्यान, एअरबीएनबी उद्योजकता अकादमीच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना खंवटे यांनी सांगितले की, 'गोव्यात देश, विदेशी पर्यटकांची संख्या घटली व पर्यटक इतरत्र जात आहेत, असा अपप्रचार केला जातो. मात्र राज्य सरकारने नियम सुलभ करून होम स्टे आणि पर्यटनाशी संबंधित इतर व्यवसायांना वाव दिला आहे. ग्रामपंचायती किंवा सोसायट्यांनी पर्यटन खात्याला सहकार्य करून बेकायदा गेस्ट हाऊस किंवा हॉटेल्सची माहिती द्यायला हवी. सरकार जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देत आहे.'
तर ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सींवर बडगा
ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सींना नोंदणी नसलेली हॉटेल्स, गेस्ट हाऊस हाताळता येणार नाहीत. तसे केल्यास पर्यटन खाते कारवाईचा बडगा उगारू शकते. याबाबत राज्याच्या पर्यटन विभागाकडे नोंदणी नसलेल्या एकाही हॉटेलला ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सींनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर स्थान देऊ नये' असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी गुरुवारी असे स्पष्ट केले.