लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणाहून गोव्याची तीन दाम्पत्ये केवळ पंधरा मिनिटांपूर्वी निघाल्याने ते बचावले. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये २६ गोवेकर अडकले असून, सर्वजण सुखरूप आहेत. राज्य सरकारची यंत्रणा त्यांच्या संपर्कात आहे व त्यांना आवश्यक ती मदत केली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गोव्यातील सर्व पर्यटनस्थळांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नावर सांगितले.
दरम्यान, मंत्रिमंडळाने बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. कुर्ती-फोंडा येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी १ लाख ६० हजार चौरस मीटर जमीन हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्य एका ठिकाणी पर्यटन प्रकल्पासाठी आयटीची ६,२५० चौरस मीटर जमीन हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला. गोमेकॉत काही पदे कंत्राटी पद्धतीवर भरण्यात येणार आहेत.
प्रशासन स्तंभ आता चिंबल येथे. २५ हजार चौ. मी. जमीन सर्वसाधारण प्रशासन खात्याकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हा स्तंभ आता चिंबल येथे होणार असून, प्रशासन स्तंभ इमारत ७५ मिटर उंचीची राज्यातील सर्वाधिक उंच इमारत असेल.
या इमारतीला पंधरा मजले असतील तसेच त्याचा अंदाजित खर्च ३०० कोटी असेल. त्याचबरोबर मंत्रिमंडळ बैठकीत गोमेकॉत कर्करोग केअर सेंटरसाठी ३१० कोटी रुपये मंजूर करण्याचा तसेच कंत्राटी पध्दतीवर काही पदे भरण्याचा निर्णयही घेण्यात आला.
टॅक्सीवाल्यांना कायदा हातात घेता येणार नाही. पर्यटक वाहनात असताना तर गैरप्रकार मुळीच चालणार नाहीत. टॅक्सीवाल्यांना अॅपवर यावेच लागेल. पोलिस, आरटीओ अधिकाऱ्यांना कारवाईचे सक्त आदेश दिलेले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वाढदिवस कार्यक्रम रद्द
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी २४ रोजी वाढदिवसानिमित्त जाहीर केलेले कार्यक्रम काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रद्द केले आहेत. केवळ सेवा व वैद्यकीय कार्यक्रम होतील, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.