पणजी : कला व संस्कृती खात्यातर्फे आयोजित करण्यात येणारा डी.डी. कोसंबी विचार महोत्सव १७ ते २१ फेब्रुवारीपर्यंत दीनानाथ मंगेशकर सभागृहात सायंकाळी ५ ते ७ या दरम्यान होणार असल्याची माहिती कला व संस्कृती खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर यांनी दिली. यंदाच्या आठव्या कोसंबी महोत्सवात विविध विषयांवर व्याख्यान देण्यास जगप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांना निमंत्रित करण्यात आले आहे. यात रिझर्व बँकेचे गर्व्हनर डॉ. रघुराम राजन, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन, रंगकर्मी तसेच जाहिरात क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्त्व अलेक पदमसी, नियोजन आयोगाचे माजी सदस्य अरुण मैरा, अहमदाबाद येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेचे संस्थापक प्रो. अनिल कुमार गुप्ता यांचा समावेश आहे. डॉ. रघुराम राजन ‘डेमोकक्रासी अॅण्ड फ्री एन्टरप्राइज : कॉन्करन्सी अॅण्ड कॉनट्रेडिक्शन’ या विषयावर व्याख्यानाचे पुष्प गुंफणार आहेत. डॉ. के. राधाकृष्णन ‘मॅथेमॅटिक अॅण्ड स्पेस मिशन’ विषयावर, अलेक पदमसी ‘आयडिएशन : द वाईल्डफायर दॅट इज स्विपिंग द वर्ल्ड’ विषयावर, अरुण मैरा, ‘शेपिंग अवर फ्युचर : वन कंन्ट्री वन डॅस्टीनी’ या विषयावर तर प्रो. अनिल कुमार गुप्ता ‘मायनिंग द माइड फॉर अ मिनिंगफुल फ्युचर : लेसन फ्रॉम द हनीबी नेटवर्क’ विषयावर व्याखानाची पुष्पे गुंफणार आहेत, असे लोलयेकर यांनी सांगितले. अरुण मैरा हे नियोजन आयोग पदावर असताना औद्योगिक आणि शहरीकरणाला विशिष्ट उंचीच्या स्तरावर पोहोचविण्यासाठी खास आकार देण्यासाठी त्यांनी कार्य केले. पदमसी यांनी जाहिरात क्षेत्रात शंभरपेक्षा अधिक ब्रॅण्ड दिले आहेत. प्रो. अनिल कुमार गुप्ता हे कृषी व्यवस्थापनाचे अभ्यासक आहेत. मधमाशांच्या नेटवर्कप्रमाणे संस्था व्यवस्थापन असावे असा त्यांचा दृष्टिकोन आहे. डॉ. रघुराम राजन हे रिझर्व बँकेचे २३वे गर्व्हनर आहेत. त्यांनी अमेरिकन फायनान्स असोसिएशनचे अध्यक्षपद भूषविले आहे. डॉ. राधाकृष्णन हे एक कुशल व दूरदृष्टी लाभलेले व्यक्तिमत्त्व आहेत. आपल्या नेतृत्वाखाली अनेक नवयुवकांना घडविण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मंडळाचे संचालकपदे भूषविली आहेत. (प्रतिनिधी)
कोसंबी विचार महोत्सवास १७ फेब्रुवारीपासून प्रारंभ
By admin | Updated: January 31, 2015 02:32 IST