मडगाव - अश्लील व्हिडीओ प्रकरणात गोव्यात आलेली मॉडेल पूनम पांडे सध्या अडचणीत सापडली असतानाच आणखी एक वादग्रस्त मॉडेल मिलिंद सोमणही अशाच प्रकारच्या कृत्यामुळे कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. त्याच्या विवस्त्रावस्थेतील फोटोमुळे कोलवा पोलीस स्थानकावर गुन्हा नोंद झाला असून या प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पोलीस त्याला समन्स बजावणार असल्याचे निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी सांगितले.आपला 55 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मिलिंद आपली पत्नी अनिता कुवर हिच्यासह दक्षिण गोव्यातील वार्का येथील कारावेला बीच रिसॉर्टमध्ये उतरला होता. त्याच दरम्यान वार्का बिचवर विवस्त्रावस्थेत धावताना त्याची पत्नी अनिता हिने हा फोटो शूट केला होता. मिलिंदने तो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.या संदर्भात गोवा सुरक्षा मंच या राजकीय पक्षाच्या युवा आघाडीने मिलिंद विरोधात वास्को पोलीस स्थानकात तक्रार दिली होती मात्र हा प्रकार कोलवा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडल्याने ही तक्रार तिथे वर्ग करण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरा मिलींदच्या विरोधात भादंसंच्या 294 ( अश्लील चित्र प्रसारित करणे) आणि आयटी कायद्याच्या 67 ( इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लील चित्र पाठविणे) या कलमाखाली गुन्हा नोंद केला.मिलिंद सोमणच्या विरोधात अशा प्रकारचा गुन्हा नोंद होण्याची ही दुसरी खेप असून 1995 साली मॉडेल मधू सप्रे हिच्यासह एका जाहिरातीत विवस्त्र पोज दिल्याने मुंबई पोलिसांच्या सामाजिक शाखेने गुन्हा नोंद केला. या प्रकरणी 14 वर्षे न्यायालयीन लढत दिल्यानंतर 2009 साली त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले होते.
न्यूड फोटो प्रकरणी कोलवा पोलीस मिलिंद सोमणवर समन्स बजावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 13:17 IST